५० परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा
छत्रपती संभाजीनगर : Navodaya Entrance Exam – जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तब्बल १७ हजार ४०२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, त्यासाठी जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेतून उपलब्ध होणाऱ्या ८० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी जयेश चौरे यांनी दिली.
नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत मोफत दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होते. जिल्ह्यातील कन्नड येथे जवाहर नवोदय विद्यालय असून, या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यंदाही या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, हजारो विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. १७ हजार ४०२ विद्यार्थ्यांसाठी ५० परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे. यासाठी ५० केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यासह अन्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मर्यादित जागा आणि मोठ्या संख्येने परीक्षेला बसणारे विद्यार्थी यामुळे प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
ग्रामीण भागासाठी ६०, तर शहरी भागासाठी २० जागा
नवोदय विद्यालयातील एकूण ८० प्रवेश जागांपैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ६०, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी २० जागा राखीव आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेशाची संधी मिळणार आहे.
१०० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा
ही परीक्षा १०० गुणांची असून, प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, भाषा, सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेची रचना केली जाते.
Read About : Icse Isc Board Exam Time Table 2027 – आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.