यंदा परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा महत्त्वपूर्ण बदल
छत्रपती संभाजीनगर: Icse Isc Board Exam Time Table 2027 – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स तर्फे (सीआयएससीई) २०२७ मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची (आयएससी) परीक्षा ९ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची (आयसीएसई) परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षांसाठी देश-विदेशातील एकूण ३ लाख ७९ हजार ९८० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर ९ फेब्रुवारी रोजी इंग्रजी भाषा विषयाचा असेल. तर दहावीच्या परीक्षेची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी इंग्रजी भाषा विषयाच्या पेपरने होणार आहे. दोन्ही परीक्षांचे सविस्तर विषयानुसार वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यंदाच्या परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकातील महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी १०.४५ वाजता प्रश्नपत्रिका वाचनासाठी दिली जात होती आणि सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात होत होती. मात्र, २०२७ च्या परीक्षेपासून प्रश्नपत्रिका वाचनासाठी सकाळी १० वाजता दिली जाणार असून, प्रत्यक्ष लेखनाला सकाळी १०.१५ वाजता सुरुवात होईल. त्यामुळे परीक्षार्थींना सकाळी ९.४५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थी आणि केंद्रे
देश-विदेशातील ३ हजार १०६ शाळांमधील सुमारे २ लाख ७० हजार विद्यार्थी २ हजार ८३५ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत एकूण ७६ विषयांचा समावेश आहे. तर जवळपास १ हजार ६५१ शाळांमधील १ लाख १० हजार २५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. बारावीची परीक्षा देश-विदेशातील एकूण १ हजार ४७७ केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांची प्रवेशपत्रे डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
क्षमता आधारित मूल्यांकनावर भर
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांनुसार यंदाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची केवळ पाठांतराची क्षमता न तपासता त्यांच्या संकल्पनात्मक समज, चिकित्सक विचारशक्ती आणि समस्या निराकरण करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हानांसाठी सक्षम बनवणे, हा क्षमता आधारित मूल्यांकनामागील मुख्य उद्देश असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता, पारदर्शकता आणि प्रशासकीय सचोटी कायम ठेवत प्रत्येक विद्यार्थ्याला आपले ज्ञान सिद्ध करण्याची समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून देण्यावर मंडळाचा भर असणार आहे.
Read About : Historic Educational Institutions Fund – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.