पाकिस्तानातील घटना : फार्महाऊस मालकासह टिकटाॅकरला अटक
लाहोर : TikTok Video Lion Attack – टिकटॉक व्हिडिओमुळे पाकिस्तानात एका १९ वर्षांच्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना लाहोरजवळच्या काहना भागातील एका फार्महाऊसवर घडली. नौमान हसन नावाचा टिकटॉकर या फार्महाऊसवर व्हिडिओ बनवण्यासाठी आला होता, असे सांगितले जाते. व्हिडिओसाठी त्याने एका सिंहीणीला पिंजऱ्याबाहेर काढायला लावले. फार्महाऊसवर काम करणारा तल्हा हा १९ वर्षांचा तरुणही तेव्हा तिथेच होता. चित्रीकरण सुरू असताना सिंहीण अचानक बिथरली आणि तिने तल्हावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
वडिलांच्या डोळ्यांदेखत मृत्यू
‘डेली पाकिस्तान’च्या वृत्तानुसार, हल्ला झाला तेव्हा तल्हाचे वडील आणि भाऊ हाशिमही तिथे होते. ते दोघेही त्याच फार्महाऊसवर काम करत होते. आपल्या मुलावर होणारा हल्ला वडिलांना डोळ्यांसमोर पाहावा लागला.
कुत्रा चावल्याचा बनाव
घटनेनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. तल्हाला कुत्रा चावला, असे आधी सांगण्यात आले. मात्र पोलिसांच्या तपासात खरी गोष्ट उघड झाली. तल्हाच्या जखमा कुत्र्याच्या नव्हे, तर सिंहीणीच्या हल्ल्याच्या होत्या. ‘टिकटॉकची हौस कुणाच्याही जिवापेक्षा मोठी असू शकत नाही,’ असे लाहोर पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
तिघांना अटक, ३३ सिंह जप्त
काहना पोलिसांनी फार्महाऊसचा मालक फय्याज ऊर्फ फैजी आणि टिकटॉकर नौमान यांच्यासह तिघांना अटक केली आहे. फार्महाऊसचा प्राणी-प्रजननाचा परवाना २०२५ मध्येच संपला होता, तरीही तिथे प्राणी ठेवले जात होते, असे तपासात समोर आले. पोलिसांनी फार्महाऊसवरून ३३ सिंह जप्त केले. हल्ला करणाऱ्या सिंहिणीला वन्यजीव विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. तल्हाच्या वडिलांच्या तक्रारीवरून वन्यजीव कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
कोण आहे नौमान हसन?
नौमान हसन हा लाहोरचा टिकटॉकर आहे. तो सिंह आणि वाघांसोबत धोकादायक व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जातो. त्याचा एक व्हिडिओ आधीही खूप गाजला होता. त्यात त्याने वाघाच्या तोंडात हात घातला होता. ‘माझा वाघ रॉकी खूप फ्रेंडली आहे,’ असे त्याने त्या व्हिडिओसोबत लिहिले होते. हा मूर्खपणा थांबव, असे अनेकांनी त्याला सांगितले, पण त्याने कुणाचे ऐकले नाही.
आधीही झाली होती कारवाई
नौमानवर याआधीही कारवाई झाली आहे. २०२४ मध्ये त्याने सार्वजनिक ठिकाणी वाघ फिरवतानाचा व्हिडिओ बनवला होता. तेव्हा पंजाबच्या वन्यजीव विभागाने त्याचा वाघ जप्त केला आणि न्यायालयात त्याच्यावर दंडात्मक कारवाईही झाली. म्हणजे त्याला आधीच इशारा मिळाला होता. तरीही त्याचे सिंह-वाघांसोबतचे स्टंट थांबले नाहीत.
समाजमाध्यमांवर संताप
या घटनेवर समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्ह्यूज आणि लाइक्ससाठी प्राण्यांना खेळणे समजले गेले आणि त्याची किंमत एका निरपराध तरुणाला जीव देऊन मोजावी लागली, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.
Read About : Cyberbullying among students worldwide – जगभरातील दहापैकी 1 विद्यार्थ्याला सायबर बुलिंगचा फटका E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.