मराठवाड्यातील कारखानदारांकडून प्रतिटन ३ हजार ते ३ हजार १०० रुपये दर; पहिली उचल ३,९०० रुपये देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर : Sugarcane Price 4200 Rupees पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये प्रतिटन भाव द्यावा, अशी आग्रही मागणी गंगापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. याबाबत शुकवारी, १३ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालकांसह कृषी अधिकारी डॉ. एस. एच. जेधे यांना निवेदन देऊन रास्त भावासाठी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाल्यानंतर उसाला प्रतिटन ४,२०० रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील साखर कारखानदार उसाला केवळ ३००० ते ३१०० रुपये प्रतिटन दर देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.
३,९०० हवी पहिली उचल
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३ हजार ९०० रुपये मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे भाऊसाहेब शेळके, देविदास पाठे, विनोद काळे, अमोल वायसळ, इम्रान पटेल, अवधूत वायसळ आदी शेतकऱ्यांसह समितीचे पदाधिकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची खुलेआम लूट
बाजारात साखरेचे ठोक विक्री दर १५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केंद्र शासनाने स्वीकारलेल्या डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार आणि ऊस नियंत्रण कायद्यातील ७०:३० च्या रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार साखर व उपपदार्थांच्या उत्पन्नातील योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. परंतु, या कायदेशीर तरतुदींना डावलून साखर कारखानदार शेतकऱ्यांची खुलेआम उघड लूट करीत आहेत, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.
कारखानदारांंचे संगनमत
जिल्ह्यातील बारामती ॲग्रो, पंचगंगा शुगर, मुक्तेश्वर शुगर, छत्रपती संभाजी साखर उद्योग, जय हिंद शुगर तसेच इतर साखर कारखान्यांनी संगनमताने कमी दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. या मागण्यांची प्रशासनासह साखर आयुक्तालयाने गंभीर दखल घेऊन दोन दिवसांत संबंधित कारखानदारांची बैठक बोलवावी आणि मराठवाड्यातील उसालाही प्रतिटन ४ हजार २०० रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ठोस व सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघर्ष समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी साखर आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी जेधे यांनी दिली.
Read About : Maharashtra River Linking Project – नदीजोड प्रकल्पाचे काम पुढील वर्षापासून होणार सुरू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.