रब्बीसाठी कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू, दुष्काळी भागासाठी उपाययोजना
परभणी Jayakwadi Water in Parbhani : यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी पडला. त्यामुळे येथे उन्हाळ्यात संभाव्य चारा आणि पाणीटंचाई लक्षात घेता राज्य शासनाने रब्बी हंगामातील पशुचारा आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी जायकवाडी धरणातून रब्बी हंगामाकरिता कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू केले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतीला डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
नाथसागर जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे उजवा व डाव्या कालव्याच्या माध्यमातून नियोजित वितरण होत आहे. या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळाला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग परभणी जिल्ह्यात पोहोचले असून जिल्ह्यातील रब्बी हंगामाला सिंचनाचे बळ मिळाले असल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याकामी गुंतला आहे. अल निनोमुळे उद्भवलेल्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने अन्नधान्य व चारा पिकांची लागवड करून घ्यावे. जायकवाडी प्रकल्पांतर्गत सर्व लाभधारकांनी पाणी वापराबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात तीन पाणीपाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, इतर अन्नधान्य तसेच चारा पिकांसाठी १५ ऑक्टोबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत कालव्याद्वारे तसेच मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाने नुकतेच शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी करणारे अर्ज मागवले आहेत.
पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत
जायकवाडीच्या कालव्यांमधून सुरू झालेले पाणी वितरण रब्बी पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जायकवाडी धरणाचा पाणीपुरवठा हा शेतीबरोबरच अनेक शहरांच्या आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित ठेवत सिंचनासाठीही पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. जायकवाडीच्या कालव्यांमधून सुरू झालेल्या पाणी वितरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार आहे.
पूर्णा नदीपात्रात आज सोडणार पाणी;
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी : परभणी आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पूर्णा नदीपात्रात शनिवारी (दि.१४) सकाळी १०.३० वाजता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संभाव्य पाणीपातळी वाढीबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमतनगर कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार, महानगरपालिका परभणी आणि नगर परिषद पूर्णा यांच्या मागणीनुसार पूर्णा नदीवरील रहाटी व पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये अनुक्रमे १ दलघमी व ०.५ दलघमी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे परभणी आणि पूर्णा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार आहे. या नियोजनानुसार शनिवार, दि. १४ रोजी सकाळी १०.३० वाजता सिद्धेश्वर धरणाच्या वक्रद्वाराचे पाच बॅकवॉटर ३० सेंटीमीटरने (एक फूट) उघडून पूर्णा नदीपात्रात सुमारे २ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचण उद्भवल्यास पाणी सोडण्याच्या वेळेत अंशत: बदल होऊ शकतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी
नदीकाठच्या परिसरातील गावांमधील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने किंवा जनावरे सोडू नयेत. तसेच कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले जाणार असले तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Read About : AI Shopping in India- ऑनलाइन खरेदीसाठी एआयचा वापर वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.