Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra State Marathi Drama Competition 2026 – राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा 16 नोव्हेंबरला वाजणार!

रसिकांना १४ नाटकांची मेजवानी, महाविद्यालयांत रंगताहेत तालमी

छत्रपती संभाजीनगर Maharashtra State Marathi Drama Competition 2026 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला सोमवार, १६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्य संस्थांसह महाविद्यालय संघांच्या तालमींना जोरदार सुरू आहेत.

निराला बाजारमधील तापडिया नाट्य मंदिरमध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. त्यामुळे नाट्य रसिकांना दिवाळीनंतर आता दर्जेदार उत्तमोत्तम नाट्य प्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्राला समृद्ध नाट्य परंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्य संस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते.

रंगकर्मींची जय्यत तयारी

स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून मन लावून तालमी करत आहेत. अभिनय, संवादफेक, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील अचूक हालचालींचा कसून सराव दिवस-रात्र सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेत विविध आणि नावीन्यपूर्ण विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांच्या सशक्त अशा नाट्य प्रयोगांचे दर्शन घडणार आहे. नाट्य प्रयोगांना नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


नाटक आणि सादरकर्ते


१६ नोव्हेंबर : नाटक ‘गाथा’, सादरकर्ते विवेकानंद महाविद्यालय.
१७ नोव्हेंबर : ‘रंग’, उत्कर्ष थिएटर्स
१८ नोव्हेंबर : ‘कर्मण्यवाधिकारस्ते’, स्वर लता फाउंडेशन.
१९ नोव्हेंबर : ‘कारखाना’, सुंदेश्वर बहुउद्देशीय संस्था.
२० नोव्हेंबर : ‘संदर्भ नसलेली गोष्ट’, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान.
२१ नोव्हेंबर : ‘गुपैर्विहीना बहु जल्पयन्ति’, स. भु. महाविद्यालय.
२३ नोव्हेंबर : ‘अनामिका’, रुद्रेश्वर आर्ट फाउंडेशन.
२५ नोव्हेंबर : ‘बुजगावणं, रंगफौज प्रतिष्ठान.
२६ नोव्हेंबर : ‘कुठं गेले अण्णा?’, प्रतिष्ठान कला संस्कृती.
२७ नोव्हेंबर : ‘मेला तो शेवटचा होता’, बजाज ऑटो लिमिटेड.
३० नोव्हेंबर : ‘राजाभियोग’, लोकजागृती बहुउद्देशीय संस्था.
१ डिसेंबर : ‘जोशी विरुद्ध जोशी’, ‘नभरंग प्रतिष्ठान’.
२ डिसेंबर : ‘राजे तुम्ही पुन्हा?’, अजिंठा स्कूल ऑफ ड्रामा
३ डिसेंबर : ‘राजे तुम्ही पुन्हा?’, अभिराज बहुउद्देशीय संस्था.

Read About : Mahadev Betting App Scam- महादेव बेटिंग ॲप घोटाळ्याचा सूत्रधार कोठडीत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.