Ad Advertisement Ad Advertisement

Codeine Syrup Smuggling in Sambhajinagar पोलिसांची चाहूल लागताच नशेच्या सिरपचा साठा सोडून तस्कर पसार!

६०० बाटल्या जप्त : संगमनेरच्या डीलरचा संभाजीनगरात पुरवठा, तीन तास पाळत ठेवून पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : Codeine Syrup Smuggling in Sambhajinagar संभाजीनगरात नशेच्या औषधींचा पुरवठा करणाऱ्या संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील एका डीलरचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे हा डीलर आणि त्याचे दोन साथीदार सिरपचा साठा आणि कार सोडून पसार झाले. पोलिसांनी तीन तास वाट पाहिली, पण आरोपी काही कारजवळ परतले नाहीत. त्यामुळे कार आणि ६०० बाटल्या कोडेन सिरप जप्त करण्यात आले. कटकट गेट भागात १४ नोव्हेंबरला रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कारमालकाविरुद्ध जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अयफाझ जब्बार शेख (रा. गल्ली नं. १, चिश्तिया मस्जिदजवळ, संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांचा आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. अयफाझ हा संभाजीनगरात नशेच्या औषधींचा पुरवठा करणारा मोठा डीलर असल्याचा पोलिसांना संशय आहे. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कटकट गेट येथील सदफ कॉलनीतील गल्ली क्र. २ मध्ये समोसा गार्डनजवळ एका इर्टिगा कारमध्ये (एमएच ०२, ईझेड ९६६०) कोडेन सिरपचा मोठा साठा असल्याची खबर एएनसीचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली.

त्यावरून उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, अंमलदार सतीश जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण, चालक होमगार्ड पठाण यांच्या पथकाने सापळा रचला. संशयित कार तेथे आढळली. मात्र, तीन तास वाट पाहिल्यानंतरही कारजवळ कोणीही आले नाही. त्यामुळे अखेर कार आणि त्यातील कोडेन सिरपच्या ६०० बाटल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला. तांत्रिक विश्लेषणातून कारमालक अयफाझचे नाव निष्पन्न करून त्याच्यासह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक रिसिव्हर कोण?

संगमनेरचा डीलर अयफाझ याने बाराशे बाटल्यांचा सिरपचा साठा शहरात आणला होता. पोलीस कारवाईपूर्वीच त्याने अर्धा साठा आधीच शहरात उतरविला होता. याचा अर्थ कटकट गेट किंवा जिन्सी परिसरात त्याचा मोठा स्थानिक पंटर सक्रिय असावा. शिवाय, अयफाझसोबतचे अन्य दोन साथीदारही शहरातीलच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो स्थानिक पेडलर कोण? याचा तपास पोलीस करीत आहेत.

बॅच नंबरवरून मुळापर्यंत तपास

जप्त केलेल्या ६०० बाटल्यांवरील उत्पादक कंपनी आणि बॅच नंबर या तपशिलावरून हा साठा नेमका कोणत्या राज्यातून किंवा स्टॉकिस्टकडून उचलला गेला, याचा छडा औषध प्रशासन विभागाच्या मदतीने लावला जाणार आहे. त्यावरून हा माल कोठून आला?, कोणाच्या नावाने आला? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Read About : Investment Scam Sambhajinagar – 20 दिवसांत दामदुप्पटचे आमिष दाखवून गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.