वाढते जेट फ्युएल दर, देखभालीचा खर्च आणि विमानांच्या पुरवठ्यातील विलंबामुळे विमान कंपन्यांसमोर आर्थिक आव्हान
नवी दिल्ली : Air Travel Slowdown विमानाच्या इंधनाचे (जेट फ्युएल) वाढते दर, देखभालीचा वाढता खर्च आणि नवीन विमानांच्या वितरणात होणारा विलंब यांमुळे पुढील दोन ते तीन वर्षांत हवाई प्रवासात मंदी येण्याची शक्यता निम्म्याहून अधिक विमान कंपन्यांनी वर्तवली आहे. मॅकिन्से या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, भू-राजकीय अस्थिरता आणि सुरू असलेल्या संघर्षांमुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होऊन इंधनाच्या किमती भडकू शकतात. हवाई प्रवास हा किमतींबाबत अत्यंत संवेदनशील असल्याने, इंधन आणि देखभालीचा खर्च वाढल्यास प्रवाशांच्या मागणीवर थेट परिणाम होऊ शकतो. एका सर्वेक्षणानुसार, ५६ टक्के विमान कंपन्यांना पुढील दोन ते तीन वर्षांत हवाई प्रवासात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच, विमानांच्या पुरवठ्यातील विलंब आणि इंजिनशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडू शकते.
आर्थिक स्थितीचे संमिश्र चित्र
२०२५ च्या आर्थिक आकडेवारीचा संदर्भ देत अहवालात म्हटले आहे की, विमान वाहतूक क्षेत्रातील ११ पैकी ८ उपक्षेत्रांनी २०२५ मध्ये सकारात्मक आर्थिक नफा नोंदवला आहे, जो कोरोना महामारीनंतरचा सर्वाधिक आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्राला २०२५ मध्ये १२.८ अब्ज डॉलर्सचा आर्थिक तोटा झाला असला, तरी तो २०१२-१९ मधील २०.९ अब्ज डॉलर्सच्या सरासरी वार्षिक तोट्यापेक्षा सुमारे ४० टक्क्यांनी कमी आहे.
मदतीसाठी एआयचा पर्याय
विमान कंपन्या, विमानतळ आणि विमान उत्पादक कंपन्यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला असला, तरी केटरिंग, ग्राउंड हँडलिंग, विमान देखभाल आणि ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी यांसारखी सेवा क्षेत्रे पुन्हा नफ्यात आली आहेत. किमतींचे अचूक नियोजन, देखभालीचा पूर्वअंदाज आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरू शकते, असेही अहवालात नमूद केले आहे. मात्र, इंधनाचे उच्च दर आणि कामकाजातील अडथळे या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासमोर आव्हान कायम ठेवतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
Read About : NPCI UPI Merchant Incentive Scheme – यूपीआय व्यवहारांवर मिळणार आर्थिक लाभ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.