Ad Advertisement Ad Advertisement

Ghosla Hydropower Project – घोसला जलविद्युत प्रकल्पासाठी 45 हजार झाडांची होणार कत्तल

कंपनीचा अंदाज : वन विभागाकडून कागदपत्र पडताळणी सुरू, १० हजार कोटींची गुंतवणूक, ३५० हेक्टर जमीन प्रस्तावित

छत्रपती संभाजीनगर Ghosla Hydropower Project : सह्याद्री पर्वतरांगेची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगररांगेत ४००० मेगा. वॅटचे २ महाकाय जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहेत. पैकी नायगाव जलविद्युत प्रकल्पासाठी जवळपास २ लाख ८६ हजार झाडे बाधित होणार असल्याने त्यास पर्यावरणवाद्यांचा कडाडून विरोध आहे. तथापि, याच डोंगररांगेत प्रस्तावित दुसरा ‘घोसला’ जलविद्युत प्रकल्पासाठी वन विभागाकडे हैदराबादेतील कंपनीने दिलेल्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. तर या प्रकल्पात तब्बल ४५ हजार झाडे तोडली जाण्याची शक्यता कंपनीने अर्जातून (पार्ट बी) व्यक्त केला आहे.

घोसला प्रकल्पासाठी ३५० हेक्टर (८६४ एकर) जमीन प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पैकी ७० एकर जमीन ही वन जमीन आहे. प्रस्तावित भूक्षेत्र हे सोयगाव, सिल्लोड आणि पाचोरा (जि. जळगाव) तालुक्यातील गावांत आहे. यासाठी बहुळा प्रकल्पातून पाणी उचलले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, सोयगाव तालुक्यातील अंजोला, घोसला, नंदातांडा, नंदगाव, तिडका, पोहरी बु, पाचोरा तालुक्यातील अर्वे, डोंगरगाव, गोरडखेडे बु, खडकदेवळे खु, मोंढाळे, पिंप्री, सारोळे बु, सतगाव, शेवाळे आणि वाघुळखेडे या १७ गवांच्या सीमेत हा प्रकल्प असणार आहे. प्रकल्पासाठी प्रस्तावित क्षेत्रापैकी ७० एकर जमीन ही वन जमीन आहे. प्रस्तावित नायगाव जलविद्युत प्रकल्पापासून अवघ्या ११ किमी. अंतरात हा दुसरा घोसला प्रकल्प प्रस्तावित आहे.

१६ जुन २०२६ रोजी कंपनीकडून अर्ज केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. २००० मे.वॅ. या प्रकल्पाची क्षमता असून नायगाव प्रकल्पापासून त्याचे अंतर अवघे ११ किमी आहे. प्रकल्प बांधकामासाठी १२ लाख मेट्रिक टन खडी, २१ लाख मेट्रिक टन वाळू, १२०० मेट्रिक टन दगड, ४ लाख १० हजार मेट्रिक टन सिमेंट तर ३० हजार मेट्रिक टन स्टील वापरले जाणार आहे. ३८०० मेट्रिक टन स्फोटकांचा वापर येथे होणार आहे.

प्रकल्प बांधकामादरम्यान तब्बल ४५ हजार तोडली जाणार असल्याचे कंपनीने आपल्या अर्जात म्हटले आहे. तर २० हजार पर्यायी झाडे या बदल्यात कंपनी लावणार आहे. यासाठी २० लाखांचा निधी कंपनीने प्रस्तावित केला आहे. १७५ किमीची नवीन ट्रान्समिशन लाइनही कंपनीने प्रस्तावित केली आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी केंद्राकडून प्रकल्पाचा टीओआर (संदर्भ अटी) मंजूर कण्यात आला आहे.

अजिंठा डोंगराला हवे संरक्षण

अजिंठा डोंगर रांगेत समृद्ध जैवविविधता आहे. दुर्मिळ, संकटग्रस्त, धोकाग्रस्त वन्यप्राण्यांचा अधिवास आणि वाघांचे संचारमार्ग आहेत. हजारो वर्षांपासून येथील परिसंस्था या डोंगरांने जपलेली आणि वाढवलेली आहे. यामुळे येथील समृद्ध जैवसाखळी खंडित करण्याचे पातक परवडणारे नाही असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. डोंगररांगेला ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा’चा (इएसझेड) दर्जा द्यावा. ही रांग ‘संरक्षित’ टायटलअन्वये सुरक्षित करावी अशीही मागणी होत आहे.

कोणतेही सर्वेक्षण सुरू नाही

घोसला प्रकल्पाबाबत कोणतेही सर्वेक्षण सुरू नाही. फक्त प्रकल्पाबाबत प्राप्त कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. नायगाव प्रकल्पासाठी झालेल्या सॅम्पल सर्वेनुसार बरीच झाडे बाधित होणार असून वन विभागाने नकारात्मक अभिप्राय नोंदविलेला आहे.
– सुवर्णा माने, उप-वनसंरक्षक

Read About : Chhatrapati Sambhajinagar Burglary – 6 वाजता कुटुंबीय हैदराबादला गेले अन् 9 वाजता चोराने फ्लॅट फोडला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.