Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Firecracker Pollution : अक्कल नेमकी कुठे पेंड खाते?

Diwali Firecracker Pollution : दीपावलीच्या सणासुदीच्या काळात एक व्हीडिओ फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हजार-पाचशे फटाक्यांची एक पेटलेली लांबच लांब माळ, एक युवक हातात घेऊन स्वत:च्याच डोक्याभोवती गरगरा फिरवत असतो आणि अखेरीस ती पेटलेली माळ तो दूरवर कुठं तरी भिरकावून देतो. ती पेटलेली माळ नेमकी कुठं जाऊन पडणार… कुणाच्या अंगावर पडून तो/ती भाजून निघणार की कुणाच्या घरावर पडून त्या घराला आग लागणार, याची त्या बेदरकार तरुणाला जराही फिकीर नसते.

या तरुणाला हे असं का करावसं वाटलं, हा या लेखाचा विषय नाही. पण यंदा एकूणातच फटाक्यांनी ऐन दिवाळी जो काही हाहा:कार माजवला, तो मात्र अत्यंत चिंताजनक आहे. त्यावर भाष्य करणं, हे खरं तर पालथ्या घडावर पाणी टाकण्यासारखं असलं, तरी आवश्यक आहे.
राज्याच्या राजधानी मुंबईत तर यंदा फटाकेबाजीनं अग्निकल्लोळ उडवून दिला. सहा नोव्हेंबरला म्हणजे रविवारच्या नरक चतुर्दशीच्या दोन दिवस आधी मुंबईत आगीच्या ३३ घटना घडल्या. त्यातील १२ आगी या बेमुर्वतखोर फटाकेबाजीमुळे लागल्या होत्या. तर सात नोव्हेंबर या दिवशी फटाक्यांमुळे १६ आगी लागल्या. त्या दिवशी मुंबापुरीत एकूण ५६ आगी लागल्या होत्या. मुंबईत आगीच्या या घटनांमुळे एकाला हकनाक आपल्या प्राणास मुकावं लागलं आहे तर तीन जण जबर जखमी झाले आहेत. जे मुंबईत फटाकेबाजीमुळे घडत होतं तेच पुणे-नाशकातही घडत होतं आणि राज्याच्या अन्य भागातही परिस्थिती वेगळी नव्हती.

या बेबंद फटाकेबाजीबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं सातत्यानं सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण या बंदीला विचारतो कोण? पोलिसांकडे तक्रार केली तर बहुसंख्य वेळा त्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जातात किंवा ‘अशा शेकडो तक्रारी आल्या आहेत, आम्ही कुठे कुठे धाव घेणार?’ अशी उत्तरं मिळतात. त्यात तथ्य नक्कीच आहे. पण मग न्यायसंस्थेनं दिलेल्या आदेशांची जी पायमल्ली सामुदायिकरीत्या सुरू आहे, त्याचं काय करावयाचं, हा खरा प्रश्न आहे. सरकार या सगळ्याकडे डोळ्यावर कातडं ओढून बघत आहे आणि न्यायसंस्थाही हतबल होऊन, या साऱ्या घटना स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून बघत आहे.

अर्थात, न्यायसंस्थाही हतबलच असणार; कारण न्यायसंस्थेचं काम हे आदेश देण्याचं असतं. त्या आदेशांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही वेगळीच असते आणि ती यंत्रणा तर ‘आपण आणि ते’ या एकाच मुद्याभोवती गेले एक तप घुटमळत आहे. जे दिवाळीतील फटाकेबाजीचे तेच गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या दणदणाटाचे आणि तेच गोकुळअष्टमीला थरावर थर चढवणाऱ्या गोविंदाचे. ‘डीजे’च्या या वर्षानुवर्ष चालणाऱ्या दणदणाटाने आजवर अनेकांना कानाचे आजार झाले. त्याचबरोबर थेट डोळ्यांवर येणाऱ्या लेझरने अनेकांना दृष्टिविकार जडले. पण, कान आणि डोळे बंद करून हा दणदणाट ऐकणाऱ्या आणि लखलखाट बघणाऱ्या समाजाचं काय? त्या पलीकडची बाब ही गणरायाच्या टोलेजंग उंचीबरोबरच या मूर्ती शाडूच्या असाव्यात की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, या वादाची आहे. दरवर्षी हा वाद रंगतो. मग कोर्टाच्या चावडीवर राणा भीमदेवी थाटात युक्तिवाद होतात. मूर्तिकारांच्या रोजीरोटीचे सवाल उपस्थित केले जातात आणि तशाच उंच मूर्ती उभ्या राहतात.

थरावर थर रचताना अनेक गोविंदा खाली कोसळतात. जखमी होतात. कधी कुणी प्राणही गमावतो. मग त्यांच्या विम्याचा प्रश्न चर्चेत येतो. विमा असलाच तर भले त्या गोविंदाच्या कुटुंबियांना काही पैसे मिळतातही. पण त्यामुळे गेलेला गोविंदा परत येणार असतो काय, याचा विचारही कोणी करत नाही. वर्षानुवर्ष ‘कालचाच खेळ आज पुन्हा’ आणि ‘आजचाच खेळ उद्या पुन्हा’ या न्यायानं मख्खपणे समाज बघत असतो; पण त्यात काहीही बदल करावयाला कोणीही तयार नसतं. आपल्या या समाजाला हा मख्खपणाचा रोग नेमका कधीपासून जडला आहे; याचा विचार करणं हे समाजशास्त्रज्ञांचं काम आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब या ‘मानसिक’ रोगातून हा समाज बाहेर कधी पडणार आहे, हा आहे. खरं तर राजकीय नेत्यांचंच हे काम आहे. केवळ ‘फटाके वाजवू नका!’ असे सेलिब्रिटींचे व्हीडिओ करून ते साध्य होणार नाही. पण एकीकडे हे असे व्हीडिओ करावयाचे आणि त्याचवेळी फटाक्यांच्या धुराने हवेतील रोगजंतू आणि किडेमकोडे मरतात, असं वक्तव्य करायचं, हा काय प्रकार आहे?

पण हे झालं फटाकेबाजीमुळे लागणाऱ्या आगी आणि त्यामुळे होणारी हानी. दुसरा मुद्दा आहे तो प्रदुषणाचा. फटाक्यांच्या धुरामुळे कमालीचं प्रदुषण होत असून, त्यामुळे अनेकांना फुफ्फुसांचे विकार होत आहेत. अधिच राज्यातील मुंबई, पुणे तसंच अन्य शहरांमध्ये पुनर्विकासासाठी अनेक इमारतींचं पाडकाम सुरू आहे. त्यामुळे दिवाळी असो वा नसो या महानगरांवर काळ्याकुट्ट धुक्याची चादर पसरली असल्यासारखं वातावरण आहे. त्यात या फटाकेबाजीमुळे मोठी भर पडत आहे. दिवाळीच्या दिवसांतील फटाकेबाजीनंतर जगातील सर्वात प्रदुषणग्रस्त अशा १०० शहरांपैकी ९३ शहरं ही भारतातील असल्याचं आढळून आलं आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर या शहरानं जगभरातील सर्वात प्रदुषणग्रस्त शहरांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकवला आहे! तर दिल्लीच्या हवेत गेल्या रविवारी म्हणजेच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमालीची घसरण झाली. ही परिस्थिती ‘गंभीर’ असल्याचं सरकारनंच जाहीर केलं आहे.

आपल्या देशाचं आणि विशेषत: महाराष्ट्राचं आजचं वर्तमान हे असं आहे. भविष्याचा विचार केला तर आपल्या लोकांचं वर्तन हे असंच राहिलं तर काळाकुट्ट अंधार दिसतो. एकीकडे राज्याला भीषण दुष्काळानं ग्रासलं आहे तर शहरांमध्ये लाखोंच्या फटाक्यांचा धूर आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगण्याऐवजी लोक हे बेधुंद वागत आहेत. त्यामुळेच आज अवघ्या महाराष्ट्राची अक्कल कुठे पेंड खायला गेली आहे, असा प्रश्न विचारावासा वाटतो.

प्रकाश अकोलकर
संपर्क : ९८९२७२७७००

Read About : Women Investors in India – गृहलक्ष्मीची सोनपावलं…
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.