Peter Lynch Investment Strategy : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार ‘पीटर लिंच’ यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना चांगल्या कंपन्यांची निवड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत. त्यांचा सर्वांत प्रसिद्ध सिद्धांत Invest in What You Know, हा नवोदित गुंतवणूकदारांसाठी गुरुमंत्र स्वरूपात आहे. याबाबत विस्तृत स्वरूपात जाणून घेऊ..
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला काही प्रश्नांना वारंवार सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने समावेश होणारे प्रश्न – कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत? किती कंपन्यांचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असावेत? शेअर खरेदी करण्याचा योग्य कालावधी कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या ‘पीटर लिंच’ यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पीटर लिंच हे अमेरिकेतील प्रसिद्ध फिडेलिटी मॅगेलन फंडचे व्यवस्थापक होते. त्यांनी १९७७ ते १९९० या कालावधीत फिडेलिटी मॅगेलन फंडाचे व्यवस्थापन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली फंडाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या गुंतवणूक पद्धतीमध्ये विविध क्षेत्रांतील व्यवसायाची समज, कंपन्यांचा सखोल अभ्यास आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांना विशेष महत्त्व होते. पीटर यांचे शेअरमधील गुंतवणुकीस पूरक असलेले विचार जाणून घेताना पोर्टफोलिओमध्ये कोणत्या स्वरूपातील कंपन्यांचा समावेश असावा, हे देखील सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
स्वत:च्या अनुभवातून गुंतवणुकीची संधी शोधा
पीटर लिंच यांचे गुंतवणूक तत्त्वज्ञान सामान्य गुंतवणूकदाराला एक महत्त्वाचा संदेश देते. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी मोठे भांडवल, गुंतागुंतीचे तांत्रिक ज्ञान किंवा सतत बाजारावर लक्ष ठेवणे आवश्यक नाही. मात्र, योग्य माहिती, संयम, अभ्यास आणि आर्थिक शिस्त आवश्यक आहे. लिंच यांचा सर्वांत प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे Invest in What You Know, याचा अर्थ आपण ज्या व्यवसायाबद्दल जाणतो, ज्या वस्तू किंवा सेवा घेतो, त्या क्षेत्रातील कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणुकीच्या संधी शोधाव्यात. आज भारतीय शेअर बाजारात बँकिंग, विमा, औषधनिर्मिती, वाहन, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रांतील कंपन्यांचा अभ्यास करताना पीटर लिंच यांचा सिद्धांत मार्गदर्शक ठरू शकतो.
कंपनीचा व्यवसाय समजून घ्या : पीटर यांच्या मते, ज्या कंपनीत आपण गुंतवणूक करणार आहोत, त्या कंपनीचा व्यवसाय आपल्याला समजला पाहिजे. कंपनी नेमके काय उत्पादन करते, तिचे ग्राहक कोण आहेत, उत्पन्न कुठून मिळते आणि भविष्यात कंपनीच्या व्यवसायाला किती संधी आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखादी कंपनी औषधनिर्मिती क्षेत्रात काम करत असेल तर तिची उत्पादने, संशोधन, बाजारपेठ, स्पर्धक आणि विक्री यांचा अभ्यास करावा.
कंपनीचे शेअर खरेदी करण्यामागचे कारण माहीत असावे : पीटर यांच्या मते, गुंतवणूकदाराने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी गुंतवणुकीचे कारण स्पष्ट असावे. उदाहरणार्थ, कंपनीचा नफा वाढत आहे, नवीन बाजारपेठ उपलब्ध होत आहे, उत्पादनाची मागणी वाढत आहे किंवा कंपनीचे व्यवस्थापन चांगले आहे. गुंतवणूक इच्छुक व्यक्तीने सोशल मीडियावरील टिप्स, मित्रांचा सल्ला किंवा बाजारातील अफवा यावर आधारित गुंतवणूक करणे टाळावे.
कंपन्यांचे व्यवसायवाढीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण : पीटर यांनी कंपन्यांचे व्यवसायवाढीच्या स्वरूपानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण केले आहे. याबाबत नवोदित गुंतवणूकदारांनी समजून घेतल्यास पोर्टफोलिओमधील संभाव्य आर्थिक धोके कमी करून अधिक परतावा प्राप्त करण्यास मदत होईल.
१. कमी वेगाने वाढणाऱ्या कंपन्या (Slow Growers)
काही कंपन्यांचा व्यवसाय स्थिर स्वरूपात असतो, पण व्यवसाय वृद्धी संथ गतीने होत असते.
२. मोठ्या आणि मजबूत कंपन्या (Stalwarts)
या श्रेणीत येणाऱ्या कंपन्यांचे विशिष्ट क्षेत्रात स्थान मजबूत असले तरीही व्यवसाय वृद्धी मध्यम स्वरूपाची असते.
३. वेगाने वाढणाऱ्या कंपन्या (Fast Growers)
कंपन्यांच्या विक्रीमध्ये, उत्पन्नामध्ये आणि नफ्यामध्ये सातत्याने चांगली वाढ होत असते. अशा कंपन्या नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करतात, उत्पादन क्षमता वाढवतात आणि व्यवसायाचा विस्तार करतात. उदाहरणार्थ, भारतात रिटेल ब्रँडच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या कंपन्या.
४. चक्रीय वाढीवर अवलंबून कंपन्या (Cyclicals)
आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील मागणीनुसार नफा वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या कंपन्या. उदाहरणार्थ वाहन, पोलाद आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्या.
५. परिवर्तन सक्षम कंपन्या (Turnarounds)
आर्थिक अडचणींमधून बाहेर पडून पुन्हा प्रगती करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना परिवर्तन सक्षम कंपन्या म्हणतात. काही कंपन्या व्यवस्थापनातील त्रुटी, वाढते कर्ज, उत्पादनांची घटती मागणी, आर्थिक नुकसान किंवा स्पर्धेमुळे अडचणीत येतात. मात्र नवीन व्यवस्थापन, खर्चावर नियंत्रण, आर्थिक पुनर्रचना, नवीन उत्पादने आणि व्यवसाय धोरणातील बदल यांच्या मदतीने अशा कंपन्या पुन्हा प्रगती करू शकतात.
६. मालमत्ताधारक कंपन्या (Asset Plays)
काही कंपन्यांकडे जमीन, इमारती, मौल्यवान गुंतवणूक, इतर कंपन्यांमधील भागभांडवल किंवा मोठ्या प्रमाणात आर्थिक मालमत्ता असते. मात्र, शेअर बाजारात त्या कंपनीचे एकूण मूल्य या मालमत्तेच्या संभाव्य मूल्यापेक्षा कमी असू शकते. अशा कंपन्यांना मालमत्ताधारक कंपन्या असे म्हणतात. उदाहरणार्थ गोदरेज ग्रुप.
थोडक्यात, हे वर्गीकरण लक्षात घेतल्यास गुंतवणूकदाराला प्रत्येक कंपनीकडून किती अपेक्षा ठेवाव्यात आणि तिच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे करावे, हे समजण्यास मदत होते.
प्रा. कौस्तुभ खोरवाल
Read About : Dhanteras Significance and Rituals : धनत्रयोदशी
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.