जायकवाडीच्या ओलिताचा बट्ट्याबोळ : ३० टक्के क्षेत्राच्या सिंचनाचेही वांधे
छत्रपती संभाजीनगर Jayakwadi Irrigation Capacity : जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून १ लाख ८३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येत असल्याचा दावा केला जात असला तरी जलसंपदा विभागाने यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी अवघ्या ५९ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचे नियोजन केले आहे. धरणातील १० टक्के बफरसाठा राखीव ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने पाच ऑक्टोबररोजी दिले आहेत. त्यानुसार पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतु, एकूण क्षमतेच्या अवघे ३० टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी कसरत करावी लागत असून, सिंचनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून (लांबी २०८ किमी) १ लाख ४१ हजार ४४० हेक्टर, तर उजव्या कालव्यातून (१३२ किमी) ४१ हजार ६८२ हेक्टर जमिनीचे सिंचन होत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जातो. मात्र, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी दोनही कालव्यातून अनुक्रमे ४५ हजार आणि १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्याच सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. उजव्या कालव्याच्या लायनिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून कालव्याची वहन क्षमता २२०० क्युसेकवर पोहोचल्याचे बोलले जाते. मात्र, प्रत्यक्षात १२०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. डाव्या कालव्याची वहन क्षमता ३६०० क्युसेक आहे. परंतु २२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
पाणीवापर संस्था कागदोपत्री
शेतकऱ्यांकडून सिंचन व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे पाणीवापर संस्थांचे जाळे निर्माण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्राचा विचार करता, सुमारे ८०० पाणीवापर संस्था तयार करणे अपेक्षित होते. या उलट अवघ्या ५० संस्थांची निर्मिती निविदा काढून करण्यात आली असून, त्यातील अनेक संस्था कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांवर पाणी मोजण्याचे यंत्र उपलब्ध नसून, सोडलेल्या पाण्याचा हिशेब ढोबळपणे केला जातो. कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देत सिंचित झालेल्या पिकांचे क्षेत्र अचूकपणे मोजले जात नसल्याचे दिसून येते.
पाण्याच्या हिशेबात घोळ
यंदा सप्टेंबर महिन्यात जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. सध्या धरणात ६८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणातील सुमारे ३२ टक्के पाणी कमी झाले आहे. हे पाणी नेमके गेले कुठे?, त्याचा वापर कुठे झाला याबाबत स्पष्टता नाही. पाण्याच्या आकडेवारीत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे. पाणी सोडण्यापूर्वी कालव्यावर त्याचे मोजमाप होणे आवश्यक आहे. त्यासाठी अद्ययावत मोजणी यंत्रे बसविण्यात यावीत. १ लाख ८३ हजार हेक्टर सिंचन क्षमतेपैकी एकट्या परभणी जिल्ह्याचे क्षेत्र ९६ हजार हेक्टर आहे. मात्र, वितरिका, चाऱ्या, पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीअभावी तेथे क्षमतेच्या १२ टक्केच सिंचन होत आहे.
– शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.