२०२७ पासून रॉकेट आणि अंतराळयानांच्या चाचण्यांना सुरुवात; २०२९ मध्ये चंद्राच्या कक्षेत डॉकिंग चाचणी, तर अंतिम मोहिमेत 3 अंतराळवीर सहभागी होणार.
बीजिंग : China Moon Landing 2030 चंद्रावर मानव पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी चीनने चार वर्षांचा सविस्तर कृती आराखडा जाहीर केला आहे. २०३० पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीर उतरवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. चीनच्या चंद्र संशोधन कार्यक्रमाचे मुख्य डिझायनर वांग शियांग यांनी बीजिंग येथे झालेल्या सातव्या मॅन्ड स्पेस सिम्पोजियममध्ये या मोहिमेची माहिती दिली.
चीन प्रथम पृथ्वीच्या कक्षेत रॉकेट आणि अंतराळयानाच्या चाचण्या करणार आहे. २०२७ च्या सुरुवातीला ‘लॉन्ग मार्च १० ए’ रॉकेटच्या मदतीने मेंगझोऊ अंतराळयानातून मालवाहतूक करून चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचवली जाईल. यामुळे यानाची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासता येईल. २०२८ मध्ये तीन टप्प्यांच्या लॉन्ग मार्च १० रॉकेटद्वारे लान्यू चंद्रयानाची मानवरहित चाचणी होईल. चंद्रावर उतरून पुन्हा उड्डाण करण्याची क्षमता तपासली जाईल.
२०२९ मध्ये निर्णायक डॉकिंग चाचणी
२०२९ मध्ये लान्यू लँडर आणि मेंगझोऊ अंतराळयान स्वतंत्र रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जातील. चंद्राच्या कक्षेत दोन्ही यानांना जोडण्याची (डॉकिंग) चाचणी होईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास मानवासह मोहिमेचा मार्ग मोकळा होईल.
दोन अंतराळवीर चंद्रावर उतरणार
अंतिम मोहिमेत तीन चिनी अंतराळवीर सहभागी होतील. त्यापैकी दोघे चंद्रावर उतरून तीन पृथ्वी-दिवस तेथे संशोधन आणि बाह्य अवकाशातील कामे करतील, तर तिसरा अंतराळवीर यानातच राहील. दरम्यान, अमेरिकेच्या नासाही आर्टेमिस-४ मोहिमेद्वारे २०२८ च्या सुरुवातीला अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे चंद्र मोहिमांमध्ये चीन आणि अमेरिकेच्या नियोजनाकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Read About : Why Glue Does Not Stick to Bottle – डिंक स्वतःच्याच बाटलीला का चिकटत नाही? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.