Ad Advertisement Ad Advertisement

CSN CCTV Project – शहरातील प्रमुख रस्ते, वसाहती आणि कॉलन्यांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे उभारा

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव; तज्ज्ञ एजन्सीकडून सर्वेक्षण करून खर्चासह डीपीआर तयार करण्याची सूचना

छत्रपती संभाजीनगर : CSN CCTV Project – शहरात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, महिलांची छेडछाड, मंगळसूत्र चोरी आणि अन्य गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

महापौर अनिता नंदकुमार घोडेले यांनी १६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यांची संख्या पुरेशी नसल्याने महापालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, वसाहती, सोसायट्या आणि कॉलन्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नियंत्रण यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

यासाठी तज्ज्ञ एजन्सीमार्फत संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून आवश्यक कॅमेऱ्यांची संख्या, नियंत्रण यंत्रणा आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रस्तावाच्या सूचक महापौर अनिता नंदकुमार घोडेले असून, अनुमोदक म्हणून किशोर नागरे यांची स्वाक्षरी आहे.

Read About : NPCI UPI Merchant Incentive Scheme – यूपीआय व्यवहारांवर मिळणार आर्थिक लाभ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.