Ad Advertisement Ad Advertisement

Qualcomm Layoffs – नोकरी गेली, पण इंजिनिअर खूश!

क्वालकॉमच्या कपातीत मिळणार १५ महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम

बंगळूरू : Qualcomm Layoffs – नोकरीवरून काढल्याची बातमी कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी धक्काच असते. पण दिग्गज चिप कंपनी क्वालकॉमच्या एका इंजिनिअरसाठी कंपनीचा हा निर्णय चक्क दिलासा ठरला. आयआयटीमधून शिकलेला हा इंजिनिअर स्वत:च नोकरी सोडण्याच्या विचारात होता. त्यामुळे कंपनीची कर्मचारी कपात त्याच्यासाठी मोठी संधी ठरली. नोकरी गेल्यानंतर त्याला सुमारे १५ महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम मिळणार आहे.

या इंजिनिअरने आपली गोष्ट रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितली आहे. कंपनीतील कामाचे वातावरण त्याच्यासाठी खूप कठीण झाले होते. तो रोज नोकरी सोडण्याचा विचार करत असे. अशात क्वालकॉममध्ये कपातीची बातमी आली आणि कंपनीतून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्याला वाटले.

इंजिनिअरच्या म्हणण्यानुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याने कंपनीतच दुसऱ्या टीममध्ये बदली करून घेतली होती. घराजवळ राहून काम करता यावे म्हणून तो दुसऱ्या शहरात गेला. पण नव्या टीममधील अनुभव चांगला नव्हता. तिथे सहकार्याचा अभाव होता शिवाय छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याच्यावर टीका होत असे. त्याची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनेही त्याच्याकडे कौशल्याचा अभाव असल्याचे म्हटले होते. आपण नवीन गोष्टी शिकायला तयार होतो, पण टीमकडून आवश्यक सहकार्य मिळाले नाही, असे तो सांगतो. आधीच्या टीममध्ये त्याची कामगिरी चांगली होती. नव्या टीममध्ये आल्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. कामाचा ताण आणि वाईट वागणूक यामुळे तो त्रस्त झाला होता.

कपातीची बातमी ऐकताच मॅनेजरला म्हणाला, ‘माझेही नाव घाला’

क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो एमोन यांनी कर्मचाऱ्यांना कपातीच्या योजनेची माहिती दिली. ही बातमी मिळताच इंजिनिअरने त्याकडे कंपनी सोडण्याची संधी म्हणून पाहिले. त्याच दिवशी त्याने डायरेक्टर आणि मॅनेजरला कपातीच्या यादीत त्याचे नाव घालण्याची विनंती केली. मॅनेजरने त्याची विनंती नोंदवून घेण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी त्याला नोकरीवरून काढल्याची अधिकृत सूचना मिळाली.

१५ महिन्यांच्या पगाराएवढी आर्थिक सुरक्षा

कंपनीकडून मिळणारे सेव्हरन्स पॅकेज आणि इतर रकमा मिळून त्याला सुमारे १५ महिन्यांच्या पगाराएवढी आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. ३ महिन्यांचा नेहमीचा सेव्हरन्स पे, ३ दिवसांच्या आत कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यास एका महिन्याचा जादा पगार, कंपनीतील सेवाकाळाच्या आधारावर ५ महिन्यांचा पगार, २ महिन्यांचा रिलोकेशन बोनस, जो त्याला परत करावा लागणार नाही, शिल्लक सुट्ट्यांच्या बदल्यात मिळणारे पैसे, जानेवारीअखेरपर्यंत मिळणे अपेक्षित असलेला नियमित पगार. या सगळ्या रकमा जोडल्यावर, नोकरी नसतानाही सुमारे १५ महिने आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहता येईल, असा त्याचा अंदाज आहे.

आधी कुटुंबासोबत वेळ, मग नव्या नोकरीची तयारी

सध्या नवी नोकरी शोधण्याची आपल्याला अजिबात घाई नाही, असे इंजिनिअरने म्हटले आहे. आधी त्याला कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यानंतर तो अभ्यास, मुलाखतीची तयारी आणि नव्या नोकरीसाठी अर्ज करण्याकडे लक्ष देणार आहे. कपातीची वेळ आपल्यासाठी अगदी योग्य ठरली आणि आता कोणतीही घाई न करता पुढचे नियोजन करण्याची संधी मिळाली आहे, असे तो म्हणतो.

क्वालकॉममध्ये किती जणांची नोकरी जाऊ शकते?

वृत्तांनुसार, क्वालकॉम सुमारे सात टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनीत जवळपास ५२००० कर्मचारी काम करतात. त्यामुळे सुमारे ३६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. भारतातही सुमारे १००० कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Read About : Cheap Fish Costly Diseases Health Risks – शंभर रुपयांचा मासा… लाखोचे आजार! E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.