Ad Advertisement Ad Advertisement

Ozempic Microdosing : ओझेम्पिकच्या अल्प मात्रेने आयुष्य वाढते का? तज्ज्ञ म्हणतात, ठोस मानवी पुरावे नाहीत

निरोगी व्यक्तींनी केवळ तरुण राहण्यासाठी औषध घेणे धोकादायक ठरू शकते

वॉशिंग्टन : Ozempic Microdosing वजन घटवण्यासाठी आणि मधुमेहाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ओझेम्पिक किंवा वेगोवीसारख्या जीएलपी-१ औषधांचा मायक्रोडोज म्हणजेच अत्यंत कमी मात्रा घेतल्याने वार्धक्य लांबते आणि आयुष्यमान वाढते, असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. शरीरातील जळजळ कमी करणे आणि मेंदूचे संरक्षण करणे या उद्देशाने याचा प्रचार सुरू आहे. मात्र, मानवामध्ये अशा अल्प मात्रेमुळे आयुष्य वाढत असल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

आहारातील कॅलरीचे प्रमाण कमी केल्यास प्राण्यांचे आयुष्य वाढते, हे दशकांपूर्वीच्या संशोधनातून दिसून आले आहे. जीएलपी-१ औषधे भूक कमी करत असल्याने ती अप्रत्यक्षपणे दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरतात का, यावर सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी वृद्ध उंदरांवर सेमाग्लुटाइडचा प्रयोग केला असता, त्यांचे अन्न सेवन २५ टक्क्यांनी घटले आणि आयुष्य सुमारे १२ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. तसेच त्यांची स्मरणशक्ती व स्नायूंची शक्तीही चांगली राहिली. मात्र, या प्रयोगात उंदरांना औषधाची पूर्ण प्रमाणित मात्रा दिली गेली होती, मायक्रोडोज नाही.

दुसरीकडे, दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काहींना या औषधांच्या अल्प मात्रेमुळे हृदयाचे ठोके वाढण्यासारखे दुष्परिणाम जाणवल्याने ते थांबवावे लागले आहे. नियमित मात्रेत ही औषधे हृदयविकार आणि किडनीच्या आजारांचा धोका कमी करून अप्रत्यक्षपणे आयुष्य वाढवण्यास मदत करतात. परंतु, निरोगी व्यक्तींनी केवळ तरुण राहण्यासाठी या औषधांचा मायक्रोडोज घेणे सध्या वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसून ते आरोग्यासाठी जोखमीचे ठरू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Read About : Electropathy Practitioners Homeopathy Doctor Title Ban – इलेक्ट्रोपॅथी व्यावसायिकांना होमिओपॅथी डॉक्टरांचे पदनाम वापरण्यास मनाई – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.