Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Airport Security – नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात

वॉच टॉवरवर माकड, बर्ड हिटचा धोका असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष?

नांदेड Nanded Airport Security : अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी उभारलेल्या वॉच टॉवरवर चक्क माकडाचा वावर, विमानतळाच्या बफर झोनमध्ये मटणाची दुकाने आणि प्रवेश व्यवस्थेतील कथित दुजाभाव यामुळे विमानतळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय?, असा संतप्त सवाल नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, येथे सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी कडक नियमांचा सामना करावा लागत असताना, प्रशासकीय अधिकारी किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांशी ओळख असणाऱ्यांना थेट प्रवेश दिला जात असल्याची चर्चा आहे. विमानतळाच्या सुरक्षेवर करडी नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉच टॉवरवर चक्क माकड येऊन बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच विमानतळाच्या परिसरातील बफर झोनमध्ये मटणाची दुकाने सुरू असल्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. मांसाच्या दुकानांमुळे घारी, कावळे आणि अन्य पक्ष्यांचा वावर वाढण्याची शक्यता असते. उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी पक्षी विमानाला धडकण्याचा म्हणजेच बर्ड हिटचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करून ही दुकाने सुरू कशी?, असा सवाल उपस्थित होत आहे.

ओळखीच्या व्यक्तींना नियमांतून सूट

प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना ठरावीक मर्यादेपलीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. मात्र, ओळखीच्या व्यक्तींना नियमांतून सूट मिळत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे विमानतळावरील प्रवेश व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळ प्रशासन आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी या सर्व प्रकारांची तातडीने चौकशी करून सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

Read About : MS Dhoni IPL Retirement – ‘एमएस धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स नाही’; 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.