अंबड पोलिसांची कारवाई : धारदार शस्त्रांसह ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना Tata Solar Plant Robbery Plot : जामखेड येथील टाटा सोलर पॉवर प्लांटच्या प्रतिबंधित क्षेत्रात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला. सोमवारी (दि.१६) मध्यरात्री रोहिलागड शिवारात पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सात जणांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, चोरीसाठी लागणारे साहित्य आणि एक कार, असा एकूण ४ लाख ३२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील अन्य पाच जण कारमधून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास टाटा सोलर प्लांटचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर बाबासाहेब वैद्य यांनी प्लांट परिसरात अज्ञात व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, सहाय्यक फौजदार हरकळ आणि पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी साई सिक्युरिटीचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १० ते ११ जवान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रोहिलागड शिवारातील ब्लॉक क्रमांक १६ मध्ये शोधमोहीम राबविली.
यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये माणिक बाबू चव्हाण, आप्पा मोतीराम चव्हाण, शिवा मानिक चव्हाण, जसवंत मानिक चव्हाण, प्रवीण सुभाष काळे (सर्व रा. पाडळी पुनर्वसन,ता.परतूर, जि.जालना), शेख आरिफ शेख अयुब आणि शेख युसुफ शेख फजर (दोघे रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
कारसह शस्त्रे जप्त
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चाकू, फोल्डिंग कटर, लोखंडी खंजीर, तार कापण्याचे कटर, मिरची पूड आणि दोरी आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, रोहिलागड गावाजवळील डोंगर परिसरात एक कार उभी करून ठेवली असून, त्यामध्ये लोखंडी तलवार आणि कोयता लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यानुसार पोलिसांनी कारसह शस्त्रे जप्त केली. दरम्यान, या टोळीतील अन्य पाच साथीदार ओम्नी कारमधून घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Read About : MS Dhoni IPL Retirement – ‘एमएस धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स नाही’; 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.