मुलांच्या मानसिक आरोग्याच्या खटल्यात सोशल मीडिया कंपन्या देणार २७ दशलक्ष डॉलर! अमेरिकेतील केंटकीच्या ब्रेथिट काउंटी स्कूल डिस्ट्रिक्टसोबत कंपन्यांचा समझोता
वॉशिंग्टन : Social Media Addiction Lawsuit Settlement सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या व्यसनाधीन स्वरूपामुळे किशोरवयीन मुलांमध्ये निर्माण झालेला मानसिक आरोग्याचा प्रश्न आणि त्यामुळे शाळांच्या साधनसामग्रीवर आलेला ताण या मुद्द्यावरून अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात एक मोठी घडामोड समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांनी अमेरिकेतील एका ग्रामीण शालेय जिल्हा प्रशासनाने दाखल केलेल्या खटल्यात तब्बल २७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २ अब्ज ५४ कोटी ५० लाख ८७ हजार ५०० रु.) भरपाई देऊन समझोता करण्याचे मान्य केले आहे.
आजच्या डिजिटल युगात इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. पालकांमध्ये आणि कायदेशीर वर्तुळात याविषयी तीव्र चिंता व्यक्त होत असून, कंपन्यांच्या अल्गोरिदमवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पीडित मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कायदेशीर लढा तीव्र झाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.
राज्याच्या खुला माहिती कायद्यांतर्गत प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांनुसार, केंटकीमधील ‘ब्रेथिट काउंटी स्कूल डिस्ट्रक्टि’ सोबत झालेल्या या तडजोडीत विविध कंपन्यांनी देऊ केलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे:
- मेटा प्लॅटफॉर्म्स : इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मालकी असलेल्या मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटाने सर्वाधिक म्हणजे ९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४ कोटी रु.) देण्याचे ठरवले आहे.
- स्नॅपचॅट आणि टिकटॉक : या दोन्ही कंपन्या प्रत्येकी ८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७५ कोटी) देणार आहेत.
- यूट्यूब : यूट्यूबने २ दशलक्ष डॉलर्सपेक्षा (१८ कोटी रु.) थोडे अधिक देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत यूट्यूब ही एकमेव कंपनी आहे जिने शाळेतील शिक्षकांना व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा वर्गात प्रभावीपणे वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम देण्याचेही मान्य केले आहे.
खटला टाळण्यासाठी ऐतिहासिक पाऊल
ही एकरकमी भरपाई रक्कम ‘ब्रेथिट काउंटी स्कूल डिस्ट्रक्टि’च्या २५ दशलक्ष डॉलर्सच्या (२ अब्ज ३५ कोटी रु.) वार्षिक बजेटपेक्षा तब्बल ८ टक्क्यांनी अधिक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ही तडजोड जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यावेळी आर्थिक तपशील गुप्त ठेवण्यात आले होते. या समझोत्यामुळे कंपन्यांना एका ऐतिहासिक खटल्याला सामोरे जाण्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. कॅलिफोर्नियातील ओकलंड येथील न्यायालयात १२ जून रोजी शालेय जिल्ह्याच्या तक्रारीवर देशातील पहिलीच सुनावणी होणार होती, जी आता या तडजोडीमुळे टाळण्यात आली आहे.
लॉस एंजेलिस राज्य न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान ‘स्नॅपचॅट”ची मूळ कंपनी असलेल्या ‘स्नॅप इंक’ने दोन तरुण फिर्यादींशी समझोता केला. स्नॅपचॅटची रचना जाणीवपूर्वक व्यसन लावणारी असल्याने आपल्याला नैराश्य, चिंता आणि खाण्याचे विकार जडल्याचा आरोप या तरुणांनी केला होता.
सीईओंची साक्ष टळली
इलिनॉय येथील १६ वर्षीय मुलगी आणि मिसिसिपी येथील १८ वर्षीय तरुणाने हा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात या खटल्यासाठी न्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. या फिर्यादींनी यापूर्वीच मेटा, टिकटक आणि यूट्यूबसोबत तडजोड केली होती. स्नॅपचॅट कंपनीसाठी ही पहिलीच मोठी न्यायालयीन सुनावणी होती, ज्यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पीगेल यांची साक्ष होणार होती. मात्र, या समझोत्यामुळे ती टळली आहे.
लहानपणापासून सोशल मीडियाचे व्यसन
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून यूट्यूब आणि ९व्या वर्षापासून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरण्यास सुरुवात केल्याचे या तरुणांनी म्हटले होते. ‘ऑटोप्ले’ आणि ‘इन्फिनिट स्क्रोल’ यांसारख्या फीचर्समुळे आपल्याला या ॲप्सचे तीव्र व्यसन लागले, असा त्यांचा दावा होता.
सोशल मीडिया कंपन्यांवर हजारो खटले
अमेरिकेतील लाखो मुलांवर झालेल्या परिणामांबद्दल या कंपन्यांना जबाबदार धरणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे फिर्यादींचे वकील जॉन मॉर्गन आणि एमिली जेफकॉट यांनी म्हटले होते. दुसरीकडे, स्नॅपच्या प्रवक्त्याने तरुणांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या अमेरिकेतील विविध न्यायालयांत व्यक्ती, शाळा आणि सरकारी संस्थांनी सोशल मीडिया कंपन्यांविरोधात हजारो खटले दाखल केले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या अशाच एका पहिल्या खटल्यात न्यायाधीशांनी मेटा आणि यूट्यूबला दोषी ठरवत एका तरुणीला ६ दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. तसेच, ऑगस्टमध्ये मेटाने विविध राज्यांसोबत तब्बल १८ अब्ज डॉलर्सपर्यंतचा समझोता करून इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे मान्य केले होते. आता पुढील महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी मार्च महिन्यात सुरू होणार आहे.
Read About: Mylar Plastic Insulation – चंद्रावरील घरांसाठी प्लास्टिकचे मजबूत इन्सुलेशन
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.