Advertisement Advertisement

Mera Gaon Meri Dharohar online village tour आता घरबसल्या अनुभवा आपली ग्रामसंस्कृती! दोन हजार व्हिडिओंद्वारे करा व्हिलेज टूर

The Mera Gaon Meri Dharohar initiative brings the cultural heritage of 6.23 lakh villages online, including 2,418 villages from Marathwada and nearly 11,000 villages from Maharashtra.

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावाची धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक ओळख वेगळी असते. यामुळेच ते गाव खास आणि वेगळे ठरते. देशातील अशाच ६ लाख २३ हजार ४९९ वैशिष्ट्यप्राप्त गावांचा सांस्कृतिक ठेवा, राष्ट्रीय सांस्कृतिक मानचित्रण मिशन (नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग-एनएमसीएम) अंतर्गत संकलीत करत ऑनलाइनद्वारे एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात मराठवाड्यातील २४१८ तर राज्यातील जवळपास ११ हजार गावांचा समावेश आहे. Mera Gaon Meri Dharohar online village tour


केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, एनएमसीएम अंतर्गत ‘मेरा गाव मेरी धरोहर’ हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. निवडक आणि महत्वाच्या गावांचा सांस्कृतिक डेटा संकलित करून तो https://mgmd.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ६,२३,४९९ गावांबाबत येथे विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. स्थानिक कथा, प्राचीन परंपरा, समृद्ध वारसा, कृषी परंपरा, उत्सव, कला कौशल्य, पोषाख, श्रद्धास्थान, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, आख्यायिका, लोकेशन आदी माहिती येथे उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे संकेतस्थळावर ‘लॉग इन’ करून या माहितीत आपल्याला अपडेशनही करता येते. जवळपास २००० व्हिडिओही येथे उपलब्ध आहेत. ३२.४७ लाख चौरस किमी. परिसराची व्हर्च्युअल टूर बसल्याजागी आपण करू शकतो. दरम्यान काही गावांची माहिती भरण्याचे काम शासनाकडून सुरू आहे.

पर्यटन विकासाला मिळेल चालना


प्रसिद्ध वारसा स्थळांच्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटींगसाठी शासनस्तरावर विशेष निधी आहे. विविध उपक्रमही राबविले जात आहेत. मात्र गावोगावी असलेले, विखुरलेला सांस्कृतिक वैभव आजतागायत दुर्लक्षित होते. तथापि, मेरा गाव मेरी धरोहर अंतर्गत ग्रामीण समृद्ध संस्कृती आता एका क्लिकवर जगभरात कुठेही अनुभवता येणार आहे. याचा ग्रामीण भारताची ब्रॅण्डिंग होण्यास मोठा हातभार लागत आहे. भारतातील गावांचे सर्वात मोठे सांस्कृतिक भांडार शासनाने या उपक्रमाद्वारे नागरिकांना खूले करून दिले आहे. जे पर्यटन विकासाला चालना देणारे ठरणार आहे.

ऐतिहासीक शहरांच्या यादीत समावेश नाहीच


केंद्र सरकारच्या भारतीय संस्कृती https://www.indianculture.gov.in/ या संकेतस्थळावर भारतातील ऐतिहासीक शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यात वाराणसी, भोपाळ, कोलकाता, मदूराई, पटणा, दिल्ली, लखनऊ, अहमदाबाद आणि तंजावर या ९ शहरांतील स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात ऐतिहासीक वारसा जपलेला असून लाखो पर्यटक येथे भेटी देतात. देश-विदेशात ख्यातीप्राप्त असूनही महाराष्ट्रातील एकही शहराचा यास समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उपक्रमात निवडलेल्या गावांची संख्या

जिल्हानिहाय गावांची संख्या अशी
बीड ४८८, परभणी ३४५, लातूर ३२६, जालना ३१६, हिंगोली २८४, धाराशिव २२९, छ.संभाजीनगर २२४, नांदेड २०६.