दुपारच्या डुलकीचा फायदा वेळ, कालावधी आणि व्यक्तीच्या झोपेच्या गरजेवर अवलंबून
नवी दिल्ली : Afternoon Nap Benefits दुपारी जेवल्यानंतर डोळे मिटू लागले की अनेक जण म्हणतात, थोडी डुलकी काढू या पण ही सवय खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? विज्ञानाकडे याचे अजूनही ठोस उत्तर नाही. नव्या अभ्यासांनुसार डुलकीचा फायदा तिची वेळ, कालावधी आणि व्यक्तीच्या झोपेच्या गरजेवर अवलंबून असतो.
आज अनेकांना रात्री पुरेशी झोप मिळत नाही. विद्यार्थी, नव्या पालकांपासून शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी आणि वृद्ध व्यक्तींना सलग सात ते नऊ तास झोपणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीची झोप आणि दिवसभरातील डुलकी यांचा एकत्रित विचार करण्याची गरज तज्ञ व्यक्त करत आहेत.
संशोधनानुसार २० ते ३० मिनिटांची छोटी डुलकी घेतल्याने थकवा कमी होऊन लक्ष आणि कामाची क्षमता वाढू शकते. मात्र, दुपारी तासाभरापेक्षा जास्त झोप घेण्याचा संबंध काही अभ्यासांत लठ्ठपणा आणि रक्तातील साखर वाढण्याच्या जोखमीशी जोडला गेला आहे.
मात्र, प्रत्येक वेळी मोठी डुलकी वाईटच असे नाही. शिफ्टमध्ये काम करणारे किंवा नियमित झोप पूर्ण न करू शकणारे काही लोक दीर्घ डुलकी घेऊन झोपेची कमतरता भरून काढू शकतात. खेळाडंूवरील काही अभ्यासांतही दीर्घ डुलकीमुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारू शकते, असे दिसून आले आहे.
म्हणून डुलकीला सरसकट आळस म्हणणेही चुकीचे आणि औषध समजणेही चुकीचे, तुमची दिनचर्या आणि शरीराची गरज पाहून छोटी डुलकी ‘रिचार्ज’ ठरू शकते. म्हणजेच, झोपेच्या बाबतीतही आपले शरीरच आपला खरा अलार्म आहे.
