Ad Advertisement Ad Advertisement

Sambhajinagar Drug Trafficking – मांजावर संक्रांत येताच ड्रग्ज पेडलर बनलेल्या पतंग विक्रेत्याला बेड्या!

बुढेलन भागात एनडीपीएसची कारवाई : ३१ ग्रॅम एमडी पावडरसह ९० नशेच्या गोळ्या जप्त

छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar Drug Trafficking पोलिसांच्या कारवाईमुळे मांजाची अवैध विक्री बंद झाली. त्यामुळे पतंग विक्रीच्या व्यवसायावर संक्रांत आल्याने एक पतंग विक्रेता ड्रग्ज तस्करी करू लागला. मात्र, तिथेही पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ३१.६५ ग्रॅम एमडी, ९० नशेच्या बटन गोळ्या, असा २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १७ नोव्हेंबरला एनडीपीएस पथकाने बुढीलेन भागात ही कारवाई केली.

अनिल गुलाबसिंग सुर्यवंशी (५३, रा. प्रकाश पतंग मार्ट, लोधेश्वर महादेव मंदिराजवळ, बुढीलाईन) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. बुढीलेन भागात एक व्यक्ती दुचाकीवरून ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली.

त्यानुसार, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, अंमलदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतिष जाधव, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण, विठ्ठल पवार, औषधी निरीक्षक मनोज पैठणे आणि रासायनिक विश्लेषक प्रीती क्षिरसागर यांच्या पथकाने लोधेश्वर महादेव मंदिराजवळील प्रकाश मांजा मेकर दुकानासमोर सापळा रचून अनिलला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे ९४ हजार ९५० रुपयांची ३१.६५ ग्रॅम एमडी पावडर, ३६ हजार रुपयांच्या नायट्राझेपाम १० या नशेच्या ९० बटन गोळ्या, मोबाईल आणि स्कुटी (एमएच २०, ईएम ७८६२) मिळून आली. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रगची थेट होम डिलिव्हरी

आरोपी अनिल सुर्यवंशी याचा पतंग आणि मांजा विक्रीचा पारंपारिक व्यवसाय होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या कडक इशाऱ्यानंतर पोलिसांनी मांजाविरुद्ध मोहीम उघडली. त्यामुळे मांजाची अवैध विक्री बंद झाली. त्यामुळे पतंग विक्रीच्या व्यवसायावर संक्रांत आली. त्यामुळे अनिल हा ड्रग्ज तस्करीकडे वळला. थेट दुकानातून ड्रग्ज तस्करी सुरु केल्यास लवकर पकडले जाऊ, या भीतीमुळे त्याने स्कुटीवरून थेट होम डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली होत. ही माहिती मिळताच एनडीपीएस पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्या दुकानाचीही झडती घेतली, मात्र तिथे प्रतिबंधित मांजा अथवा ड्रग्ज आढळले नाही, असे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

Read About : MLM Fraud in Chhatrapati Sambhajinagar – 3 वर्षांपासून फरार भामट्यांनी थाटली नवीन कंपनी; सेमिनार सुरु असताना ठोकल्या बेड्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.