Ad Advertisement Ad Advertisement

Fake Land Sale Deeds – चार खोट्या खरेदीखताद्वारे तब्बल 31 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न

नोंदणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दप्तरात नोंदही; गुन्हा दाखल, दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : Fake Land Sale Deeds शहरालगत असणाऱ्या चार ठिकाणच्या तब्बल ३१ एकर २८ गुंठे जमिनीचे खोटे खरेदीखत तयार करून लाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर खोटे खरेदीखत खरे दिसावे म्हणून नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्याची दस्तपरात नोंदही केली. मात्र, त्यातील पोखरी येथील मूळ जमीन मालकाने तकार केल्यानंतर आणि दप्तरातील इतर नोंदशी त्याची जुळवणी केल्यानंतर चारही खरेदीखत खोटे असल्याचे समोर आले. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात जमीन लाटणाऱ्या टोळीसह त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेेने दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी सह दुय्यम निबंधक प्रवीण राठोड यांनी तक्रार नोंदविली आहे. पोखरी येथील अरुण बळवंत कुलकर्णी यांनी नोंदणी महानिरीक्षकांकडे दस्त क्रमांक ६०२७/१९७९ बाबत २४ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार नोंदविली की, या दस्ताद्वारे आपल्या वडिलांनी पोखरी येथील गट क्रमांक ६६ मधील ५.९९ हेक्टर (१५ एकर) जमीन मोहन दगडू राठोड यांना २९ डिसेंबर १९७९ रोजी विक्री केल्याचे दाखविले आहे. परंतु असा कोणताही व्यवहार राठोड यांच्यासोबत झालेला नाही. बनावट खरेदीखत तयार करून आपल्या मालकीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खरेदीखत संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, असे तक्र्नारीत नमूद केले. या तक्रारीची गंभीर दखल नोंदणी महानिरीक्षकांनी घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षकांना दिले.

उपमहानिरीक्षकांनी सह जिल्हा निबंधकांना आणि सह जिल्हा निबंधकांनी सह दुय्यम निबंधक कृष्णा खताळ यांना दिले. कृष्णा खताळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये ६०२७ च नव्हे तर ६०२८, ६०२९ आणि ६०३० असे तब्बल चार खरेदीखत बनावट असल्याचे समोर आले. चारही दस्तांची हार्ड कॉपी (बारनिशी खंड) तपासली असता नोंदीमध्ये वापरण्यात आलेल्या पेनाची शाई ही लगतच्या पूर्वीच्या पानावरील नोंदणीमध्ये वापरण्या आलेल्या शाईपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले. नोंदीवर वापरण्यात आळेल्या शासकीय शिक्यांमध्येही तफावत आढळून आली.

तत्कालीन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांमध्येही लक्षणीय तफावत दिसून आली. डे बूकची तपासणी केली असता त्यामध्ये नोंदणी आढळून आल्या. परंतु या नोंदणीमध्ये खाडाखोड केलेली आहे. तसेच चार खरेदीखतांच्या नोंदी करताना वापरण्यात आलेले पेन, शाई व हस्ताक्षर हे डेबूक मधील लगतच्या इतर नोंदीपेक्षा वेगळे म्हणजे बनावट आहे. नोंदणी विभागातील १९७९ च्या सूची क्रमांक २ ची पडताळणी केली असता चारही खरेदीखताची नोंद त्यामध्ये दिसून आली नाही. १९७९ च्या अंगठे पुस्तकाची पडताळणी केली असा डिसेंबर १९७९ मध्ये ६०२६/१९७९ च्या नंतर चारही दस्तांच्या नोंदी अथवा संबंधित पक्षकारांचे अंगठे अंगठे पुस्तकात आढळून आले नाही.

६०२६ नंतर थेट १ जानेवारी १९८० रोजी दस्त क्रमांक १/१९८० ची नोंद आढळून आली. यावरून कार्यालयाच्या हार्ड कॉपी (बारानिशी खंड) व डे बूकमध्ये दस्त क्रमांक ६०२७/१९७९ ते ६०३०/१९७९ अशा चार दस्तांच्या बनावट नोंदी करण्यात आल्याचे समोर आले. चौकशी अहवाल कृष्णा खताळ यांनी सह जिल्हा निबंधकांमार्फत नोंदणी महानिरीक्षकांकडे सादर केला.

फेरफारसाठी दबाव

पोखरी येथील गट क्रमांक ६६ मधील ५.९९ हेक्टर (१४ एकर ३२ गुंठे) जमिनीचे बनावट खरेदीखत (६०२७/१९७९) घेऊन मोहन दगडू राठोड यांनी मांडकी सजाचे तलाठी यांच्याकडे जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये आपले नाव नोंद करण्याबाबतचा अर्ज दाखल केला. अशाच प्रकार इतरही तीन बनावट खरेदीखताद्वारे आपली नावे संबंधित जमिनीच्या सातबाऱ्याला नोंद करण्याबाबत तलाठ्यांवर दाबव टाकत आहेत.

दुय्यम निबंधक खताळ यांना बघून घेण्याची धमकी

पोखरी प्रकरणात सह दुय्यम निबंधक कृष्णा खताळ यांच्याकडून चौकशी केली जात असल्याची माहिती मोहन राठोड यांना मिळताच त्यांनी सात ते आठ लोकांना सोबत घेऊन २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान नोंदणी उपमहनिरीक्षक यांचे कार्यालय गाठले. त्यांनी उपमहानिरीक्षक यांच्या केबीमध्ये बसलेल्या कृष्णा खताळ यांना उद्देशून धमकी दिली की, तुम्ही संभाजीनगरमध्ये एकटे राहता. तुम्हाला बघून घेऊ.

दोघांना अटक, २३ पर्यंत पोलीस कोठडी

चार बनावट खरेदीखताद्वारे ३१ एकर जमीन लाटण्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोहन दगडू राठोड आणि त्याचा मुलगा नितीन मोहन राठोड या दोघांना गुन्हा दाखल होताच १७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अटक केली. त्यांना बुधवारी १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नोंदणी विभागातील ते कर्मचारी कोण?

नोंदणी विभागातील सर्व कागदपत्र, रजिस्टर, नोंदवह्या कर्मचारी, अधिकाऱ्याच्या ताब्यात असतात. असे असतानाही बारानिशी खंडामध्ये त्याची नोंद करण्यात आल्याचे दिसून आले. नोंदणी विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणात भूमाफियांच्या टोळीला कोणी मदत केली, याचा शोध घेण्याची गरज आहे.

दस्त क्रमांक दिनांक देणार घेणार गट क्रमांक गाव क्षेत्र

६०२७/१९७९ २९/१२/१९७९ बळवंत दुर्गीली कुलकर्णी मोहन दगडू राठोड ६६ पोखरी ५.६६
६०२८/१९७९ २९/१२/१९७९ माधव किसन राऊत किसन हाबू पवार ५१५ दावरवाडी १.२०
६०२९/१९७९ ३१/१२/१९७९ छगन उदाराम राठोड गोपीनाथ हरिदास चव्हाण ३४ गेवराई २.८
६०३०/१९७९ ३१/१२/१९७९ सादतुन्नीसा बेगम मा.फारखी वसंत नरसिंग चव्हाण १५४ मिटमिटा २.८५

Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.