ऊस दराचा कोणताही निर्णय न होता गुंडाळली बैठक, १५ दिवसांनी पुन्हा बैठक
छत्रपती संभाजीनगर : Sugarcane Price Hike जिल्हाधिकारी कार्यालयात उस दरवाढीबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी अक्रमक भूमिका घेत वाढीव दराची मागणी केली. परंतु जिल्ह्यातील १० पैकी ९ कारखानदारांनी उसाला वाढीव भाव देण्यास सपशेल नकार दिला. केवळ पंचगंगा शुगरकडूनच पहिली उचल ३३०० आणि अंतीम दर प्रतीटन ३५११ रुपयांची देण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे तब्बल चार तास बैठक होऊनही ऊस दराचा कोणताही निर्णय न होता संतप्त शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मध्यस्थीलाही यश आले नाही.
उसाला दरवाढ देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात वातावरण चांगलेच पेटलेले आहे. या संतापातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कन्नड येथील बारामती ॲग्रो कारखान्याची गव्हाण बंद पाडली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., आमदार प्रशांत बंब, शेतकऱ्यांसह संघटनांचे प्रतिनिधी, कारखानदार यांच्यात बैठक घेण्याचे ठरल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानुषंगाने बुधवारी (दि.१८) उस दरवाढीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
बैठकीला प्रादेशिक साखर सहसंचालक विशाल जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह १० कारखान्याचे प्रतिनिधी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३९०० आणि ३०० असे ४२०० रुपये दर कारखान्यांनी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ऊस दराबाबत तब्बल चार तास खल झाला. मात्र, जिल्ह्यातील कारखान्यांकडून या दरवाढीकडे सपशेल कानाडोळा केला. किमान पहिली उचल ३५०० हून अधिक द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
परंतु काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवतो, असे मोघम उत्तर दिले. तर संत एकनाथ कारखान्याने एफआरपी २,४९० रुपये असल्याचे सांगत २,९०० रुपयांपेक्षा अधिक उचल देणे शक्य नसल्याचे सांगितले. मुक्तेश्वरकडून ३,१००, अन बारामती ॲग्रोने ३,२११, छत्रपती संभाजी राजे ३,००१ रुपयांची पहिली उचल जाहीर केली. त्यामुळे शेतकरी व संघटनांचे पदाधिकारी संतापले. दुष्काळाची स्थिती लक्षात घेत पंचगंगा शुगरने पहिली उचल ३३०० आणि दर ३,५११ जाहीर केला. सर्वाधिक दर जाहीर केल्यामुळे पंचगंगाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
ज्यांना परवडेल त्यांनी ऊस द्यावा
बैठकीत बारामती ॲग्रोच्या प्रतिनिधींनी ज्या शेतकऱ्यांना परवडेल त्यांनीच कारखान्याला ऊस द्यावा, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे सर्वचजण संतप्त झाले. दुष्काळाच्या स्थितीत कारखान्याकडून असे वक्तव्य आल्याने आपण दु:खी झाल्याचे सांगत आमदार प्रशांत बंब म्हणाले, सर्व कारखान्यांच्या मागील आणि यंदाच्या रिकव्हरीची सहकार विभागामार्फत पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर १५ दिवसांत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल.
जळालेल्या उसावरुन संताप
महावितरणाच्या नाकरर्तेपणामुळे शेतकऱ्यांचा उभा उस जळतो. जळालेल्या उसाला कारखान्यांकडून ३०० ते ५०० रुपयांनी कमी दर दिला जातो. शासनामुळेच नुकसान होत असल्याने या उसाला कमी दर देऊ नये, अशी मागणी करीत एका शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. त्यावर शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.