भूगर्भीय लहरींच्या अभ्यासातून मंगळाच्या खोल भागात वितळलेल्या खडकाचे पुरावे
वॉशिंग्टन : Mars Lava System लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाच्या भूपृष्ठाखाली शास्त्रज्ञांना एका अत्यंत विस्तीर्ण आणि सक्रिय लाव्हा प्रणालीचे ठोस पुरावे मिळाले आहेत. मंगळ हा एक मृत आणि थंड ग्रह झाला असून तिथे कोणत्याही प्रकारची ज्वालामुखीची हालचाल शिल्लक नाही, हा जुना समज या नव्या शोधामुळे पूर्णपणे मोडीत निघाला आहे.
मंगळावर पाठवण्यात आलेल्या लँडर्सनी नोंदवलेल्या भूगर्भीय लहरींच्या अभ्यासातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या मोजमापांनुसार, मंगळाच्या कल्पनेपेक्षाही खूप खोल भागात प्रचंड प्रमाणात वितळलेला खडक अजूनही अस्तित्वात आहे. हा लाव्हा मंगळाच्या कठीण कवचातून स्वत:चा मार्ग काढत पुन्हा-पुन्हा पुनर्संचयित होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकारच्या सातत्यपूर्ण लाव्हा प्रणालीसाठी पृथ्वीसारख्या टेक्टोनिक प्लेट्स आवश्यक असतात, असा विज्ञानाचा नियम होता. मात्र, मंगळावर टेक्टोनिक प्लेट्स नसतानाही ही प्रणाली कशी कार्यरत आहे, याचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिक गुंतले आहेत.
या अंतर्गत उष्णतेमुळे मंगळाच्या जमिनीखाली कुठे पाणी किंवा बर्फ वितळलेल्या स्वरूपात असू शकतो का, यावर आता संशोधन सुरू आहे. जर तिथे उष्णता आणि पाणी दोन्ही उपलब्ध असेल, तर मंगळाच्या खोल भागात सूक्ष्मजीव स्वरूपातील जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळाच्या अंतर्गत रचनेचा हा शोध भविष्यातील मानवी मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
