एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्याकांडाचा उलगडा
तिररोडा : Varsha Turkar Murder Case पुण्यात एअर होस्टेस असलेल्या वर्षा तुरकरांची १४ नोव्हेंबरला महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील अर्जुनीजवळील बोंडराणी जंगल परिसरात प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे रहस्य गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने उलगडले. मित्राच्या पत्नीनेच १३ लाखांची सुपारी दिल्याचे उघड झाले असून तिघांना अटक केली आहे.
बोंडराणी जंगलात वर्षा यांचा चाकूने वार करून खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र आरोपी न सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. मृत महिलेच्या माहेरच्या तक्रारीवरून १५ नोव्हेंबरला दवनीवाडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम १०३(१)नुसार गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अमित डोंगरेंच्या मार्गदर्शनात पथकाने तिरोडा, खैरलांजी, बालाघाट व गोंदियातील सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती व खबऱ्यांद्वारे १९ नोव्हेंबर रोजी इमरान करीम शेख (२६, रा. संजयनगर, मुर्री, गोंदिया) याला ताब्यात घेतले. चौकशीत मृत वर्षाचा मित्र नितेश अग्रवाल याच्या पत्नीने कुणाल कुंभलवारच्या मदतीने सराईत गुन्हेगार शाहरुख पठाणला १३ लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले.
इमरान करीम शेख (२६, रा. संजयनगर, गोंदिया), शाहरुख खान फिरोज खान पठाण (३३, रा. सिंधी कॉलनी, गोंदिया), कुणाल श्यामराव कुंभलवार (३१, रा. साईमंदिराजवळ, गोंदिया) व मोना नितेश अग्रवाल (४१) यांना ताब्यात घेऊन दवनीवाडा पोलिसांकडे दिले. दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी अमरदीप खाडे, अभिषेक जंगमवार, राजीव मिश्रा, इंद्रजित भिसे, दीक्षित कुमार, होमिंदरसिंह चोरकर, रियाज शेख, विठ्ठल प्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सुजीत हलमारे, शैलेश निनावे, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर, हंसराज भांडारकर, सुनील डहाके, करण बारेवार, छगन विठुले, स्मिता तोंडरे, राम खंडारे, विलेज ठाकरे, इम्रान सैयद, रोशन एरणे व अंकित काझी यांनी केली.
प्रेमसंबंधातून हत्येचा कट
मृतक वर्षा तुरकर हिचे नितेश अग्रवालशी प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे त्रस्त झालेल्या नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिने वर्षाचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी तिने घराशेजारी राहणाऱ्या कुणाल श्यामराव कुंभलवारची मदत घेतली. त्याच्यामार्फत सराईत गुन्हेगार शाहरुख खान फिरोज खान पठाण याला १३ लाखांची सुपारी दिली. नितेश वापरत असलेली चारचाकी गाडी त्याच्या पत्नीच्या नावावर होती. या गाडीला असलेल्या जीपीएसचा पासवर्ड मोना हिने आरोपींच्या मोबाइलमध्ये कनेक्ट करून दिला. त्यामुळे आरोपींना नितेश आणि वर्षाच्या प्रवासाचे अचूक लोकेशन मिळत गेले. या लोकेशनचा पाठलाग करत आरोपींनी १४ नोव्हेंबरला बोंडराणी मंदिराजवळ गाठून वर्षाच्या पोटावर व पाठीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली.
Read About : IndiGo Air Hostess Murder Varsha Turkar – इंडिगोच्या एअर होस्टेसची धारदार शस्त्राने हत्या
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.