बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न
बाजार गेवराई Maharashtra Drought Farmer Crisis : मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडल्या असुन चारशेहून अधिक खोलीपर्यंत घेतलेले बोअरवेल सुध्दा पाणी लागत नसल्याने आठ ते नऊ वर्षांच्या फळबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे अथक प्रयत्न केले, परंतू यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बाजार गेवराई येथील गणेश कान्हेरे यांच्या सिताफळाच्या बागेतील फळे डोळयादेखत गळून पडली. बाग वाचविण्यासाठी चारशे फुट बोअरवेल घेतला तरी सुद्धा पाणी लागले नाही , त्यावर एक लाख रुपये खर्च केले; पण निसर्गापुढे हा प्रयत्नही अपुरा ठरला. दरवर्षी आठ ते नऊ लाखांचे उत्पन्न देणाऱ्या बागेत यंदा ८० टक्के फळांचे नुकसान झाले. अखेर कान्हेरे यांनी सिताफळाच्या बागेवर जेसीबी फिरवून आपला संताप व्यक्त केला.
बदनापूर तालुक्यात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पारंपारिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठया संख्येने शेतकऱ्यांनी सिताफळ, डाळिंब, मोसंबी, आंबा आदी विविध फळबागांची लागवड केली असून चांगले उत्पादन सुध्दा शेतकरी घेत होते. झाडाला लागलेले प्रत्येक फळ म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाचे फळ असते. मात्र, आठ वर्षे घाम गाळून फुलवलेली बाग, त्यातून दरवर्षी मिळणारे लाखोंचे उत्पन्न आणि यंदा बाग वाचविण्यासाठी बोअरवेल घेतला. लाख रुपयांचा खर्च करूनही निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली.
पाणीटंचाईचा मोठा फटका
बाजार गेवराई परीसरातील गणेश कान्हेरे यांच्या गट क्रमांक ४५४ मधील ४०० सीताफळाच्या बागेला पाणीटंचाईचा मोठा फटका बसला आहे. एका बाजूला पाण्याची कमतरता, तर दुसऱ्या बाजूला खत, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे बाग सांभाळणे आर्थिकदृष्टया परवडेनासे झाले. बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही भरून निघत नसल्याने अखेर त्यांनी कठोर निर्णय घेतला. डोळयांत पाणी आणून त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने एक एकरांतील सुमारे चारशे सीताफळाची झाडे मुळासकट उपटून टाकल आठ वर्षे कष्ट करून उभी केलेली बाग नष्ट झाल्याने आणि लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कायम असल्याने कान्हेरे यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीत केलेली गुंतवणूक वाया गेल्याने पुढील उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.