आरएलडीए आणि गृहनिर्माण विभाग मिळून रेल्वे मंत्रालयाला डीपीआर सादर करणार
मुंबई : Railway Land Dispute दादर प्रभादेवी येथील रेल्वेच्या भूखंडावर राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर तेथील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. रेल्वेच्या जागेवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या या रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
दादर – प्रभादेवी येथे रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (आरएलडीए) आणि राज्याचा गृहनिर्माण विभाग यांनी एकत्रितपणे या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विकास आराखडा तयार करून रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या दोन्ही यंत्रणांनी मिळून तयार केलेला विकास आराखडा रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शुक्रवारी रेल्वेने अतिक्रमणे पाडण्यासाठी प्रभादेवी परिसरात पथके पाठवल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रेल्वेमंत्र्यांशी फोनवरून संपर्क
या कारवाईबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना सद्यस्थिती सांगितली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना रहिवाशांच्या पुनर्वसनाची माहिती दिली आणि या कारवाईला स्थगिती देण्याची त्यांना विनंती केली. यानंतर रेल्वे मंत्र्यांनी ही कारवाई थांबवून रहिवाशांना दिलासा दिला.
रेल्वेला मिळणार अतिरिक्त जागा
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि राज्याच्या गृहनिर्माण विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यामुळे रहिवाशांचे पुनर्वसन तर होईलच, पण रेल्वेला अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. हाच विकास आराखडा मुंबई उच्च न्यायालयात सादर करून त्यांनाही याबाबत अवगत करण्यात येणार आहे. या आराखड्याला रेल्वेमंत्र्यांनी लवकरात लवकर मंजुरी दिल्यास या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना दिलासा देणे शक्य होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Read About : IDFC Bank Recovery Agent Harassment : रुग्णालयातही कर्जवसुलीचा तगादा; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.