Ad Advertisement Ad Advertisement

Voyager 1 : त्या तिथे पलीकडे…

Voyager 1 : स्पेस द फायनल फ्रंटियर.. व्हेअर नो मॅन हॅज गोन बिफोर… जगप्रसिद्ध स्टार ट्रेक मालिकेची सुरुवात करणारे हे वाक्य व्हॉयेजर १ यानाने अंतराळाच्या अथांग पसाऱ्यातून मार्गक्रमण करताना एक प्रकाश दिवसाचे अंतर पार करून खरे करून दाखवले आहे. माणूस अंतराळात पोहोचला असला, चंद्रावर उतरला असला तरी व्हॉयेजर १ ने गाठलेला २६ अब्ज किलोमीटर पल्ला गाठणे सध्या तरी मानवी मर्यादांच्या पलीकडचे आहे. पण, पृथ्वीच्या कुंपणापलीकडे काय आहे, या विश्वात आपल्याला कुणी शेजारी आहे की नाही की मानव अपघातानेच पृथ्वीवर निर्माण झाला आणि एकाकीच आहे, या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची मानवाची जिज्ञासा असीम आहे. तिला कालपटलाचे बंध रोखू शकत नाहीत. ४९ वर्षांपूर्वी ५ सप्टेंबर १९७७ रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या व्हॉयेजर १ ने बुधवारी दुपारी १ प्रकाश दिवसाचे अंतर पार करत अद्भुतासमान इतिहास घडवला. या यानाचा हा प्रवास ताशी ६१ हजार किमी वेगाने असाच पुढे सुरू राहणार आहे.

गुरू आणि शनी ग्रहांच्या जवळून निरीक्षणपर अभ्यासासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. पण, आता हे यान आपल्या सूर्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर निघून आंतरतारकीय अवकाशातून प्रवास करत आहे. यानावरील सुवर्ण तबकडीवर आपल्या सूर्यमालेची, पृथ्वीची आणि मानवाची सर्व माहिती कोरण्यात आली आहे. कधी तरी, कुठे तरी, दूर दूर अंतराळात वेगळ्याच एका आकाशगंगेतील बुद्धिमान सजीवांच्या हाती हे यान लागले तर तो मानवाचा आणि परग्रहावरील बुद्धिमान सजीवांचा पहिला वहिला संपर्क असेल आणि त्याला कारणीभूत असेल हे व्हॉयेजर १.

या यानाकडे पाठवलेला संदेश पोहोचायला आता २४ तास लागतात आणि तिचे उत्तर यायला आणखी २४ तास. म्हणजे आपण आज बोललो तर उत्तर परवा मिळणार. व्हॉयेजर १ जेव्हा अवकाशात झेपावले, तेव्हा या यानाचे आयुष्य फक्त पाच वर्षांचे असेल असे शास्त्रज्ञांना वाटत होते. पण, यानाचा प्रवास आजही सुरूच आहे. व्हॉयेजर १ हे फक्त एक यान नाही. ते पृथ्वीवरील सजीवांचा दूत आहे. यानातील सुवर्ण तबकडीवर पृथ्वीवरील निरनिराळे ध्वनी, आवाज आहेत. समुद्राच्या लाटा, वारा, पाऊस, पक्ष्यांची किलबिल, व्हेल माशाचा आवाज, बाळाचे रडणे, आईचे गाणे. ५५ भाषांमधून केलेले अभिवादन आहे. बाख, मोझार्ट, बीथोव्हेन यांचे संगीत आहे. भारतीय राग भैरवी आहे. ११६ छायाचित्रे आहेत. मानवी शरीर, डीएनए, सूर्यमाला, पृथ्वीचे नकाशे आहेत आणि एक संदेश आहे, ‘आम्ही इथे आहोत, आम्ही तुम्हाला शोधत आहोत.’

मानव गेली ६० हून अधिक वर्षे या विश्वातील आपले सोबती शोधत आहे. १९६० मध्ये फ्रँक ड्रेक यांनी पहिल्यांदा रेडिओ दुर्बिणीतून परग्रहावरील संदेश ऐकण्याचा प्रयत्न केला, प्रोजेक्ट ओझ्मा. नंतर सेटी मोहीम सुरू झाली. अब्जावधी ताऱ्यांकडून येणाऱ्या रेडिओ लहरी आपण कान देऊन ऐकत आहोत. आजपर्यंत कोणताही खात्रीशीर संदेश आलेला नाही, पण आपण ऐकणे थांबवलेले नाही. गेल्या ३० वर्षांत आपल्याला पाच हजारांहून अधिक परग्रह सापडले आहेत, एक्सोप्लॅनेट. काही तर पृथ्वीसारखे आपल्या सूर्यासारख्या ताऱ्याच्या राहण्यायोग्य पट्ट्यात आहेत. जेम्स वेब दुर्बिण आता त्यांच्या वातावरणात पाण्याची वाफ, मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड शोधत आहे.

मंगळावर जीवसृष्टीचे अवशेष होते का, युरोपा आणि एन्सेलाडस या बर्फाळ चंद्रांच्या समुद्रात जीव असतील का याचा शोधही सुरू आहे. अशा वेळी दूरवर कुठेतरी एका वेगळ्याच आकाशगंगेतील बुद्धिमान सजीवांना हे यान मिळाले आणि त्यांनी ती तबकडी ऐकली तर त्यांना कळेल की, एका दुसऱ्याच आकाशगंगेतील एका सूर्याभोवतीच्या ग्रहमालेतील एका निळ्या ठिपक्यावर राहणाऱ्या बुद्धिमान सजीवांनी केवळ युद्धे केली नाहीत, तर हे विलोभनीय संगीतही निर्माण केले; हीच तर मानवाची खरी ओळख आहे.

आपण एकाच वेळी पराकोटीचे क्रूर, निष्ठूरही आहोत आणि सर्जनशील वृत्तीचे प्रतिभावंतही आहोत. यानावरील कॅमेरे बंद होण्याआधी व्हॉयेजर १ ने पृथ्वीचे १९९० मध्ये घेतलेले पेल ब्लू डॉट हे छायाचित्र जगप्रसिद्ध आहे. सुमारे सहा अब्ज किलोमीटर दूरून घेतलेल्या पृथ्वीच्या या छायाचित्रात, पृथ्वी सूर्याच्या किरणांत गुरफटलेल्या एका छोट्याशा निळ्या ठिपक्याएवढी दिसते. विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन म्हणाले होते, तो धूलिकणासमान वाटणारा ठिपकाच आपले घर आहे. त्यावरच आपण सर्व, राजेमहाराजे, संतमहात्मे, शास्त्रज्ञ, शूर-भेकड, शत्रू-मित्र, जन्मले, वाढले. तिथेच आपण जगतो… आणि याच एका ठिपक्यावर नांदत असलेला मानव कुठल्याही कारणासाठी किती भांडतो, किती सीमा आखतो हे पाहून हसूही येते आणि रडूही येते. व्हॉयेजर १ जेव्हा बनत होते त्या १९७७ सालचे संगणक आजच्या मोबाईलपेक्षाही कितीतरी कमी शक्तीचे होते. तरीही त्या काळातील अभियंत्यांनी इतके टिकाऊ यान बनवले की ते ४९ वर्षे चालते आहे.

आज आपण दर दोन वर्षांनी फोन बदलतो, पण नासाने त्या वेळी अशी वस्तू बनवली, जी ४० हजार वर्षांनंतर ग्लिझ ४४५ या ताऱ्याजवळून जाईल तेव्हा पृथ्वीवर कोण असेल, कोणती संस्कृती उदयास आलेली असेल, कोणती भाषा असेल हे कोणालाच माहीत नाही. पण, व्हॉयेजर मात्र तेव्हाही असेल. शास्त्रज्ञांच्या मते, आणखी तीन ते पाच वर्षांनी एक दिवस यानाकडून मिळणारा प्रतिसाद बंद होईल. पण, यानाचा प्रवास थांबणार नाही. ते अवकाशाच्या अंधार पोकळीतून, शांतपणे, मानवाचा सोनेरी संदेश घेऊन पुढे जात राहील. कदाचित कोणीही तो संदेश कधीच ऐकणार नाहीत. कदाचित अब्जावधी वर्षे या संदेश लहरी तशाच पसरत राहतील. ताऱ्यांच्या महासागरात आपले नाव घेऊन व्हॉयेजर १ पृथ्वीवरील सजीवांची ओळख सांगत असेच पुढे जात राहील.

Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.