होकायंत्राशिवाय हजारो मैल प्रवास करणारे कासवे, शार्क आणि स्थलांतरित पक्षी दिशा कशी ओळखतात?
वॉशिंग्टन : Animals Sixth Sense समुद्री कासवे, शार्क मासे, स्थलांतर करणारे पक्षी आणि जमिनीखाली बिळात राहणारे उंदीर (मोल-रॅट्स) कोणताही होकायंत्राचा आधार नसताना हजारो मैलांचा प्रवास अचूक कसा करतात? यामागे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ओळखण्याची त्यांची अद्भुत क्षमता, म्हणजेच संभाव्य सहावे इंद्रिय कार्यरत असते. मात्र, ही क्षमता प्राण्यांमध्ये नेमकी कशी काम करते आणि मानवामध्ये याचे काही अवशेष शिल्लक आहेत का, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.
प्राणी दिशा कशी ओळखतात?
जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टट्यिूटचे संशोधक पास्कल माल्केम्पर यांच्या मते, अंधारात राहणारे मोल-रॅट्स केवळ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अंदाज घेऊन आपले घरटे नेहमी आग्नेय दिशेलाच बांधतात. तसेच, बोनेटहेड शार्क मासे चुंबकीय क्षेत्राचा वापर एखाद्या नकाशासारखा करतात, ज्यामुळे ते महासागरातून शेकडो मैल दूर जाऊनही पुन्हा आपल्या मूळ किनारपट्टीवर अचूक परत येतात.
संशोधनातील तीन प्रमुख सिद्धांत
प्राण्यांमध्ये हे चुंबकीय इंद्रिय कसे काम करते, यावर शास्त्रज्ञांचे तीन मुख्य अंदाज आहेत. पहिला सिद्धांत शरीरातील मॅग्नेटाइट नावाच्या सूक्ष्म चुंबकीय स्फटिकांशी संबंधित आहे. दुसरा सिद्धांत डोळ्यांतील क्रिप्टोक्रोम प्रथिनांमधील प्रकाश-संवेदनशील रासायनिक प्रक्रियेशी जोडलेला आहे, जो पक्ष्यांमध्ये अधिक प्रभावी मानला जातो. तिसऱ्या सिद्धांतानुसार, पाण्यात पोहताना विद्युत चुंबकीय प्रेरणेद्वारे शार्क मासे हे संकेत ओळखतात. कबुतरांच्या बाबतीत तर त्यांच्या कानाच्या आतील भाग आणि यकृतातील लोहयुक्त पेशी दिशादर्शक म्हणून काम करत असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
मानवामध्ये हे इंद्रिय अस्तित्वात आहे का?
कॅलटेक विद्यापीठाच्या एका प्रयोगात दिसून आले की, चुंबकीय क्षेत्र बदलल्यावर मानवी मेंदूच्या लहरींमध्ये सूक्ष्म बदल होतो, परंतु व्यक्तीला त्याची जाणीव होत नाही. प्राचीन काळी भटकंती करणाऱ्या मानवामध्ये ही क्षमता असावी, जी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लुप्त झाली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे, मानवाने निर्माण केलेल्या विद्युत चुंबकीय ध्वनी प्रदूषणामुळे पक्षी आणि सागरी जीवांच्या या नैसर्गिक दिशादर्शक यंत्रणेत अडथळे निर्माण होत असल्याची चिंताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
Read About : Giant Baobab Trees – 5 महाकाय बाओबाब झाडे वाचवण्याची धडपड
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.