प्रथिनांची रचना १०० पट वेगाने ओळखून औषध निर्मिती आणि सॉफ्ट रोबोटिक्सला मिळणार नवी दिशा
केंब्रिज (अमेरिका): WorldParticle AI Model वाळूच्या सरकत्या कणांपासून ते मानवी शरीरातील अत्यंत सूक्ष्म प्रथिनांच्या संरचनेपर्यंत विविध पदार्थांच्या हालचालींचा अचूक अंदाज लावणारे वर्ल्डपार्टिकल नावाचे एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल संशोधकांनी विकसित केले आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने ही प्रणाली तयार केली असून, यामुळे औषध निर्मिती आणि सॉफ्ट रोबोटिक्सच्या क्षेत्रात मदत मिळू शकते.
आतापर्यंत वैज्ञानिकांना वाहते पाणी, लवचिक वस्तू किंवा प्रथिनांची घडण अभ्यासण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गणितीय समीकरणांवर आधारित स्वतंत्र सॉफ्टवेअरचा वापर करावा लागत असे. मात्र, वर्ल्डपार्टिकल या एकाच डीप-लर्निंग आर्किटेक्चरमुळे हे सर्व प्रकारचे भौतिक बदल एकाच प्रणालीद्वारे अभ्यासणे शक्य झाले आहे. या संशोधनाचे सह-लेखक पीटर यिचेन चेन यांच्या मते, ज्याप्रमाणे चॅटजीपीटी पुढचा शब्द ओळखून वाक्य पूर्ण करते, त्याचप्रमाणे हे एआय मॉडेल कोणत्याही पदार्थाला हजारो सूक्ष्म त्रिमितीय कणांमध्ये विभागून ते कण पुढच्या क्षणी कोणत्या दिशेने सरकतील याचा टप्प्याटप्प्याने अचूक अंदाज लावते.
या तंत्रज्ञानाचे अनेक व्यावहारिक फायदे आहेत. प्रथिनांच्या संरचनेत होणारे बदल हे मॉडेल पारंपरिक संगणक प्रणालींपेक्षा तब्बल १०० पट अधिक वेगाने दाखवू शकते. या अभूतपूर्व वेगामुळे नवीन आणि प्रभावी औषधांचा शोध घेणे शास्त्रज्ञांसाठी अधिक सोपे व जलद होणार आहे. याशिवाय, वाळू किंवा मातीसारख्या अस्थिर पृष्ठभागावर चालणाऱ्या आणि नाजूक वस्तू हाताळणाऱ्या सॉफ्ट रोबोट्सची रचना सुधारण्यासाठी या प्रणालीची मोठी मदत होईल. सहा विविध भौतिक प्रक्रियांच्या चाचण्यांमध्ये या मॉडेलने पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक अचूकता सिद्ध केली आहे. भविष्यात अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स आणि वैद्यकीय संशोधनाला गती देणारे हे एक महत्त्वाचे साधन ठरेल.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.