जाहिरातीपासून निवड प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन बंधनकारक
मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग एक वर्ष जतन करावे लागणार
छत्रपती संभाजीनगर : Assistant Professor Recruitment – विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि नियमबद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नियमावली तयार करण्यात आली असून, भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर संबंधित संस्था आणि महाविद्यालयांना निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केले आहे.
विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाची १६ नोव्हेंबर रोजी आणि विद्यापरिषदेची १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील संदर्भानुसार ही नियमावली संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदांची भरती करताना संस्था आणि महाविद्यालयांनी कोणती कार्यवाही करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन नियमावलीनुसार, अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त सहायक प्राध्यापक पदे भरण्यापूर्वी शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित संस्थेने जाहिरातीचा मसुदा विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागेल. जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणाची माहिती अचूक असल्याची खातरजमा विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षामार्फत केली जाणार आहे.
निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला तसेच मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना किमान ३० दिवस आधी बैठकीची सूचना देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची माहिती निवड समितीच्या सदस्यांना बैठकीच्या किमान सात दिवस आधी उपलब्ध करून द्यावी लागेल. या नियमावलीतील सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे सहायक प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचे सीसीटीव्ही प्रणालीद्वारे रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे रेकॉर्डिंग मुलाखतीच्या दिवसापासून किमान एक वर्ष गोपनीय दस्तऐवज म्हणून सुरक्षित ठेवावे लागेल. भरती प्रक्रियेबाबत तक्रार, आक्षेप, चौकशी, न्यायालयीन किंवा अन्य वैधानिक कार्यवाही सुरू असल्यास संबंधित रेकॉर्डिंग नष्ट करता येणार नाही. प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत हे रेकॉर्डिंग जतन करावे लागणार आहे. तसेच विद्यापीठाने निश्चित केलेल्या गुणांकन निकषांनुसारच मुलाखत प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असेल.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारणे बंधनकारक
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे आवश्यक राहणार आहे. मात्र, उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास संस्थांनी ते अर्जही स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. दोन्ही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची पोहोच उमेदवारांना देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल.
प्राप्त अर्जांची छाननी करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १८ जुलै २०१८ रोजीच्या अधिसूचनेतील ‘परिशिष्ठ २ तक्ता ३ ब’ नुसार गुणांकन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. शैक्षणिक पात्रता, पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी., नेट-सेट, संशोधन प्रकाशने, अध्यापनाचा अनुभव आणि पुरस्कार यांचा विचार करून उमेदवारांचे गुणांकन केले जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग करताना सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे धोरणही विचारात घ्यावे लागणार आहे. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी तसेच सर्व अर्जदारांना दिलेल्या गुणांकनाचा तपशील विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. याशिवाय पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असेल.
पात्रतेसाठी नेट-सेट आणि पीएच.डी.चे निकष
सहायक प्राध्यापक पदासाठी संबंधित किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. याशिवाय यूजीसी किंवा सीएसआयआरची नेट परीक्षा अथवा मान्यताप्राप्त सेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यूजीसीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या पीएच.डी.धारक उमेदवारांना नेट-सेटमधून सूट लागू राहील. पीएच.डी.साठी ११ जुलै २००९ पूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्या वेळच्या नियमांनुसार निर्धारित अटी पूर्ण केल्यास नेट-सेटमधून सूट मिळू शकते. तसेच काही विशिष्ट विषयांमध्ये नेट-सेट परीक्षा घेतली जात नसल्यास संबंधित नियमांनुसार पीएच.डी. ही किमान पात्रता राहणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण भरती प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याची खातरजमा विद्यापीठाकडून केली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह नियुक्ती मान्यतेचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत विद्यापीठाकडे सादर करावा लागेल. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागेल. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित संस्था किंवा महाविद्यालयावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Read About : Health University Winter Exams – आरोग्य विद्यापीठाच्या 28 नोव्हेंबरपासून परीक्षा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.