मायक्रोसॉफ्ट, बँकिंग आणि विमान वाहतूक सेवांमधील अडथळ्यांदरम्यान व्हाइट हाऊसचा नेतृत्वबदल; किर्स्टन डेव्हिस यांच्याकडे तात्पुरता पदभार
वॉशिंग्टन डीसी : US Cybersecurity Leadership Change अमेरिकेतील महत्त्वाच्या तंत्रज्ञान आणि बँकिंग सेवांमध्ये सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड आणि सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सायबर संचालक शॉन केर्नक्रॉस आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. व्हाईट हाऊसने गुरुवारी किर्स्टन ए. डेव्हिस यांची राष्ट्रीय सायबर संचालक कार्यालयाचे (ओएनसीडी) प्रभारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
या पदावर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी अमेरिकी सिनेटची मंजुरी आवश्यक असल्याने डेव्हिस सध्या प्रभारी स्वरूपात कार्यभार सांभाळतील. ऑगस्ट २०२५ पासून या पदावर असलेले शॉन केर्नक्रॉस यांनी गुरुवारी रात्री निवेदन जारी करत ट्रम्प प्रशासनात काम करणे हा आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे म्हटले. दुसरीकडे, डेव्हिस यांनीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही डेव्हिस यांचे अभिनंदन केले आहे. तत्पूर्वी ‘फॉक्स न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, या पदावर उर्वरित दोन वर्षे काम करण्याची केर्नक्रॉस यांची इच्छा नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता.
केर्नक्रॉस यांचा राजीनामा कशामुळे?
गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट आउटलुक, युनायटेड एअरलाइन्स, प्रमुख बँका आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनएसए) सेवांमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले होते. गुरुवारी अमेरिकेतील आघाडीची बँक ‘जेपी मॉर्गन चेस’ने खुलासा केला की, बँकेला सेवा पुरवणाऱ्या थर्ड-पार्टी कंपन्यांवर सायबर हल्ला झाला आहे. एका रॅन्समवेअर गटाने जेपी मॉर्गन चेस, व्हिसा आणि मास्टरकार्डच्या ग्राहकांचा डेटा लीक केल्याचा दावा केला असून, यामध्ये जेपी मॉर्गनच्या सुमारे १६,००० श्रीमंत ग्राहकांचे ईमेल पत्ते, फोन नंबर आणि खाते क्रमांक उघड झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ‘बायनान्स’ या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवरही मोठा सायबर हल्ला झाला होता. तसेच, गेल्या आठवड्यात संघीय उड्डाण व्यवस्थापन (एफएए) प्रणालीत बिघाड झाल्याने देशभरातील हवाई वाहतूक ठप्प झाली होती. या घटनांचा थेट परिणाम म्हणून केर्नक्रॉस यांनी राजीनामा दिल्याचे मानले जाते.
नागरिकांनी घाबरू नये : डोनाल्ड ट्रम्प
या तांत्रिक बिघाडांमुळे आणि वीज पुरवठ्याबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीमुळे अमेरिकी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लोक अन्न व पाण्याचा साठा करत असल्याचे वृत्त आहे. यावर ‘एपेक’ शिखर परिषदेपूर्वी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. हे कोणतेही सुनियोजित सायबर हल्ले नसून केवळ स्वतंत्र तांत्रिक बिघाड आहेत आणि प्रसारमाध्यमे याचा बाऊ करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
Read About : Giant Baobab Trees – 5 महाकाय बाओबाब झाडे वाचवण्याची धडपड
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.