‘अनएक्स्पेक्टेड: सफेद सच’ सत्यघटनांपासून प्रेरित कथेत महिला सुरक्षा, गुन्हेगारी आणि पोलिस तपासाचे वास्तव उलगडणार
मुंबई : Unexpected Safed Sach Movie – एका छोट्याशा गैरसमजातून सुरू झालेली घटना…एका प्रेमपत्रामुळे निर्माण झालेला कौटुंबिक तणाव…रात्रीच्या बसप्रवासात अचानक बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी…आणि त्यानंतर समोर येणारे धक्कादायक प्रश्न, या सगळ्या घटनांमागचे सत्य नेमके काय? मुलीचे अपहरण झाले की तिच्यासोबत आणखी काही भयंकर घडले? या रहस्याचा उलगडा करणारा ‘अनएक्स्पेक्टेड: सफेद सच’ हा बहुप्रतीक्षित क्राइम थ्रिलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय कपूर, प्रशांत नारायणन आणि एस्थर अनिल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
डेहराडूनमधील आयएसबीटी परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेसह काही वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे. महिलांची सुरक्षा, सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षितता, न्यायव्यवस्था आणि पोलिस तपासातील आव्हाने या संवेदनशील विषयांवर चित्रपट भाष्य करणार आहे.
एका प्रेमपत्रातून सुरू होतो रहस्यमय घटनाक्रम
चित्रपटाचे कथानक एका किशोरवयीन मुलीभोवती फिरते. घरात निर्माण झालेल्या गैरसमजामुळे आणि तिच्यासाठी मुद्दाम ठेवण्यात आलेल्या प्रेमपत्रामुळे परिस्थिती गंभीर बनते. त्यानंतर ती मुलगी डेहराडूनच्या आंतरराज्य बसस्थानकावरून रात्रीच्या बसने प्रवासाला निघते, मात्र काही वेळातच बेपत्ता होते. पुढे एक बेवारस बस आढळते आणि संबंधित मुलगी बेशुद्ध अवस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल असल्याचे समोर येते. या घटनेनंतर पोलिस तपास सुरू होतो. प्रत्येक नव्या धाग्यासोबत प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत जाते. या संपूर्ण घटनाक्रमातून सत्य शोधण्याचे आव्हान आणि तपास यंत्रणांसमोरील अडचणी चित्रपटात प्रभावीपणे मांडल्या जाणार आहेत.
संजय कपूर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
या चित्रपटात संजय कपूर हे एसएसपी भारत सिंह या तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. संवेदनशील प्रकरणाचा तपास करताना पुरावे, परिस्थिती आणि अनेक अनुत्तरित प्रश्न यांची सांगड घालण्याची जबाबदारी त्यांच्या पात्रावर आहे. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित घटना केवळ बातम्या नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी अधोरेखित करणाऱ्या आहेत, असे मत संजय कपूर यांनी व्यक्त केले. सखोल तपास आणि सत्याचा शोध यांचे महत्त्व आपल्या भूमिकेतून अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मर्डर २’, ‘भाग जॉनी’ आणि ‘धरम संकट में’ यांसारख्या चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारे प्रशांत नारायणनही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. वास्तविक घटनांपासून प्रेरित असलेल्या संवेदनशील विषयाला प्रामाणिकपणे हाताळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रपटाचे कथानक आणि त्यातून उपस्थित होणारे सामाजिक प्रश्न आपल्याला या प्रकल्पाकडे आकर्षित करणारे ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
नऊ भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती
‘यश वीरा फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्यारेलाल गुंडेचा (सोजत रोड वाला) यांनी केली आहे. ‘गरुडवेगा’ अंजी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. पृथ्वीराज, थंबी रमैया, संजय सिंह आणि गंजा करुप्पू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाला केविन रॉय यांनी संगीत दिले आहे.
विशेष म्हणजे, देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गढवाली, गुजराती, पंजाबी आणि भोजपुरी अशा एकूण नऊ भाषांमध्ये तयार करण्यात येत आहे.
२०२७ मध्ये चित्रपटगृहांत धडकणार
मनोरंजनासोबतच समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा प्रयत्न आहे. महिलांची सुरक्षितता, न्याय मिळवण्यातील अडथळे आणि जबाबदार पोलिस तपास यांसारख्या विषयांना रहस्यमय कथानकाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ‘अनएक्स्पेक्टेड: सफेद सच’ हा केवळ गुन्हेगारी तपासावर आधारित थरारपट न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारा चित्रपट ठरण्याची अपेक्षा आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Read About: Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin – बॉलिवूडला नवी जोडी! सुब्हान-ऐराहचे पदार्पण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.