माध्यमिकच्या ६६, प्राथमिकच्या ७ शिक्षक, शिक्षकेत्तरांची वैयक्तिक मान्यता रद्द | दोन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस
छत्रपती संभाजीनगर : Beed Teacher Recruitment – बीड जिल्ह्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमिक विभागातील ६६, तर प्राथमिक विभागातील ७ अशा एकूण ७३ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बीड जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रकाश मुकूंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने भरती प्रक्रियेतील विविध बाबींची तपासणी करून संबंधित प्रकरणांचा आढावा घेतला. चौकशीदरम्यान तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या कार्यकाळातील भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याचे समोर आले. यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला.
या प्राथमिक चौकशीनंतर शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सर्वांची सुनावणी घेण्यात आली. या चौकशीत तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, भगवान फुलारी यांच्या कार्यकाळात वैयक्तिक मान्यता घेतलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तकर कर्मचाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली. यात माध्यमिक विभागातील ६६ तर प्राथमिक विभागातील ७ प्रकरणांमध्ये वैयक्तिक मान्यता प्रदान करताना अनियमितता झाल्याचे सिध्द झाले. त्यामुळे दोन्ही विभागांतील एकूण ७३ शिक्षक, शिक्षकेत्तर कमचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माध्यमिक विभागात सर्वाधिक प्रकरणे
या प्रकरणातील आकडेवारी पाहता माध्यमिक विभागातील अनियमिततेची व्याप्ती अधिक असल्याचे दिसून येते. माध्यमिक विभागातील सुमारे ४५० प्रकरणांपैकी ६६ प्रकरणे संशयास्पद आढळली, तर प्राथमिक विभागातील सुमारे २० पैकी ७ प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. संबंधित नियुक्त्यांच्या वेळी आवश्यक शासकीय नियम, भरतीचे निकष आणि मान्यता प्रक्रियेचे पालन झाले होते की नाही, याची तपासणी करण्यात आली. शिक्षक भरतीमध्ये आरक्षण, मंजूर पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच शासनाने निश्चित केलेल्या भरती प्रक्रियेचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र तसे काहीच दिसून न आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत पात्रता, शैक्षणिक निकष आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. आता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याच्या निर्णयासोबतच संबंधित तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, भगवान फुलारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Read About : Health University Winter Exams – आरोग्य विद्यापीठाच्या 28 नोव्हेंबरपासून परीक्षा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.