Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Temperature – छत्रपती संभाजीनगरचा पारा 12.4 अंशांवर

उत्तर भारतातील हिमवृष्टीचा परिणाम; यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Temperature – उत्तर भारतात सुरू झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम शहराच्या तापमानावर जाणवू लागला आहे. गेल्या आठवडाभरापासून १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापमान शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी अचानक ३.२ अंशांनी घसरून १२.४ अंशांवर आले. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री शहरात हुडहुडी भरवणारा गारठा जाणवत आहे.

उत्तर भारतात वेळेत हिमवृष्टी सुरू झाल्याने थंड वारे वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम मराठवाड्यातील तापमानावरही होत आहे. शहराच्या किमान तापमानात मागील आठवडाभरापासून चढ-उतार सुरू होते. मात्र, हिमवृष्टीमुळे शुक्रवारी तापमानात अचानक मोठी घट झाल्याची माहिती हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस होते. त्यात शुक्रवारी १.१ अंशांनी वाढ होऊन ते ३१.३ अंशांवर पोहोचले. त्यामुळे एकीकडे पहाटे आणि सायंकाळी सातनंतर थंडीचा कडाका जाणवत असताना दिवसभर मात्र उन्हाची तीव्रता कायम आहे. अल निनोच्या प्रभावामुळे कमाल तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

थंडीचा जोर वाढण्याची चाहूल

शहरात शुक्रवारी पहाटेपासूनच गारठा जाणवत होता. सायंकाळनंतर तापमानात पुन्हा घट झाल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला. यंदाच्या हंगामात प्रथमच किमान तापमान १२.४ अंशांपर्यंत खाली आल्याने आगामी दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रात्रीची थंडी आणि दिवसा उन्हाचा चटका असे परस्परविरोधी वातावरण सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे.

Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.