वर्षभरात १ लाख २२ हजार रेशन कार्डधारकांचे धान्य बंद; ४३ हजार कार्डांची तपासणी सुरू
छत्रपती संभाजीनगर : Suspicious Ration Cards in Chhatrapati Sambhajinagar – रेशनवरील स्वस्त धान्याचा अपात्र लाभ घेणाऱ्यांना वगळण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेचा जिल्ह्यात धडाका सुरू आहे. आयटीआर भरणारे, टॅनधारक, चारचाकी वाहनांचे मालक, अधिक उत्पन्न असतानाही कमी उत्पन्न दाखविणारे आणि ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेत मागील वर्षभरात तब्बल १ लाख ६५ हजार ९५३ रेशनकार्ड संशयित आढळले आहेत. त्यापैकी १ लाख २२ हजार ५१८ कार्डधारकांना प्राधान्य गटातून वगळून एनपीएच प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले असून, त्यांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आले आहे. उर्वरित ४३ हजार ४३५ कार्डांची तपासणी सुरू आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सप्टेंबर २०२५ पासून ‘मिशन सुधार’ मोहीम सुरू करण्यात आली. एका कुटुंबाच्या नावे एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असणे, कायमस्वरूपी स्थलांतर करूनही जुन्या ठिकाणी नोंद कायम असणे, आधार व ई-केवायसीमधील त्रुटी, उत्पन्नाबाबत चुकीची माहिती देणे, चारचाकी वाहनांची मालकी तसेच आयकर विवरणपत्र भरणारे आणि विविध फर्मचे संचालक असूनही स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्यांचा शोध या माध्यमातून घेतला जात आहे.
जिल्ह्यात सुमारे ८ लाख रेशनकार्ड असून, त्यापैकी ५ लाख ५२ हजार कार्डांवर धान्य योजना लागू आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात विविध कारणांमुळे सुमारे ५९ हजार ९१५ कार्ड अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर तपासणीचा विस्तार करण्यात आला. अनेक लाभार्थ्यांचे लाखोंचे उत्पन्न, विविध कंपन्यांमधील संचालकपद आणि चारचाकी वाहनांची मालकी आढळून आली. तर काही लाभार्थ्यांनी ई-केवायसीच केलेली नसल्याचे, तसेच अनेक वर्षांपासून धान्याची उचल केली नसल्याचेही तपासणीत समोर आले.
४३ हजार कार्डांची छाननी सुरू
‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १ लाख २२ हजार ५१८ लाभार्थ्यांना एनपीएच (नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड) प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. उर्वरित ४३ हजार ४३५ संशयित लाभार्थ्यांची सखोल तपासणी सुरू असून, अपात्र आढळणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
प्रवीण फुलारी,
जिल्हा पुरवठा अधिकारी
तहसील कार्ड
छत्रपती संभाजीनगर शहर २०२७८
पैठण ५८४३
वैजापूर ३९८२
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ३५५९
कन्नड २९३५
गंगापूर २११४
सिल्लोड १५३९
सोयगाव १५१८
खुलताबाद १०४२
फुलंब्री ६२५
एकूण ४३४३५
Read About : Indian Citizenship Renunciation – पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व; देश सोडण्यामागे पैसा, संधी की व्यवस्थेतील त्रुटी?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.