१९९१ नंतर अमेरिकेत एका वर्षातील गोवर रुग्णांचा सर्वोच्च आकडा; ६४६ जण रुग्णालयात दाखल
लॉस एंजेलिस : US Measles Outbreak अमेरिकेत गोवर वेगाने वाढत असून, २०२६ या वर्षात आतापर्यंत ५,८३८ रुग्णांची नोंद झाली आहे. १९९१ नंतर एकाच वर्षात आढळलेला हा सर्वाधिक आकडा आहे. सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) ताज्या आकडेवारीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत ६४६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत अमेरिकेतील ४७ राज्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये ५,८२० रुग्ण आढळले, तर परदेशातून अमेरिकेत आलेल्या १८ प्रवाशांना या विषाणूची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ११ टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली. यातील धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ९६ टक्के रुग्णांनी गोवरची लस घेतलेली नव्हती किंवा त्यांच्या लसीकरणाची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती.
सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये पेंसिल्वेनिया आघाडीवर असून, तेथे शुक्रवारपर्यंत १,६३१ रुग्ण आढळले आहेत, तर या संसर्गामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सीडीसीकडून गोवरपासून बचावासाठी एमएमआर लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत शाळेत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांमधील लसीकरणाचे प्रमाण घटल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने (पीएएचओ) जाहीर केले की अमेरिका, मेक्सिको आणि बोलिव्हिया या देशांनी आपला गोवर निर्मूलन दर्जा गमावला आहे. या तिन्ही देशांमध्ये सलग १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ एकाच प्रकारच्या विषाणूचा प्रसार सुरू राहिल्याने स्थानिक पातळीवर संसर्ग पुन्हा प्रस्थापित झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये कॅनडामध्ये संसर्ग पसरल्याने संपूर्ण अमेरिका खंडाचा गोवर-मुक्त दर्जा संपुष्टात आला होता.
या पार्श्वभूमीवर, पीएएचओने सर्व देशांना लसीकरण मोहीमेला गती देण्याचे आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक समुदायात लसीच्या दोन्ही डोसेसचे किमान ९५ टक्के प्रमाण राखण्याचे आवाहन केले आहे.
Read About : Robotic Cardiac Surgery in India : रोबोटिक हृदयशस्त्रक्रियेत 2031 पर्यंत भारत अमेरिकेलाही पछाडणार?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.