मॉर्गन स्टॅन्लेचा अंदाज; शेअर बाजारात १६ टक्के तेजीची शक्यता; तेजीच्या स्थितीत १.०५ लाखांचा टप्पा गाठण्याचा अंदाज; प्रतिकूल परिस्थितीत ६८ हजारांपर्यंत घसरणीचा इशारा
नवी दिल्ली : Morgan Stanley Sensex Target 2027 भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स डिसेंबर २०२७ पर्यंत ९५ हजारांचा टप्पा गाठू शकतो. सध्याच्या पातळीच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून, जागतिक वित्तीय क्षेत्रातील आघाडीची ब्रोकरेज संस्था मॉर्गन स्टॅन्लेने हा अंदाज व्यक्त केला आहे.
मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या ताज्या ‘इंडिया इक्वि टी स्ट्रॅटेजी आउटलुक’ अहवालात भारतीय शेअर बाजाराच्या भविष्यातील वाटचालीचे तीन संभाव्य चित्र मांडले आहेत. देशांतर्गत अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थिरता, भारत-अमेरिका व्यापार कराराचा मार्ग मोकळा होणे आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली राहणे, या घटकांच्या आधारे संस्थेने ९५ हजारांचा अंदाज वर्तविला आहे.
या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी ७५ बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. बाजारात तरलतेची स्थिती सकारात्मक राहील, नव्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होणार नाही आणि किरकोळ गुंतवणूकदारांची मागणी उपलब्ध समभागांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक राहील, असेही संस्थेचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत सेन्सेक्समधील कंपन्यांच्या नफ्यात वार्षिक सरासरी १८.१ टक्क्यांची चक्रवाढ वाढ होण्याचा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
तेजीच्या स्थितीत १.०५ लाखांचा टप्पा
शेअर बाजारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास सेन्सेक्स डिसेंबर २०२७ पर्यंत १ लाख ५ हजारांपर्यंत पोहोचू शकतो. या तेजीच्या अंदाजाला मॉर्गन स्टॅन्लेने ३० टक्के संभाव्यता दिली आहे. या परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली राहतील, पुरवठ्याशी संबंधित अडचणी कमी होतील आणि महागाईचा अंदाजही खाली येईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. याशिवाय, दीर्घकालीन भांडवली नफा कराचा दर शून्यावर आणणे, अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीला चालना देणाऱ्या सुधारणा होणे तसेच जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग कमी झाला तरी त्यात मोठी पडझड न होणे, हे घटकही या अंदाजासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या परिस्थितीत आर्थिक वर्ष २०२६ ते २०२९ या कालावधीत कंपन्यांच्या नफ्यात वार्षिक २०.३ टक्के चक्रवाढ वाढ अपेक्षित आहे.
प्रतिकूल परिस्थितीत सेन्सेक्स ६८ हजारांवर
दुसरीकडे, जागतिक आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील परिस्थिती बिघडल्यास सेन्सेक्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. प्रतिकूल परिस्थितीच्या अंदाजानुसार डिसेंबर २०२७ पर्यंत सेन्सेक्स ६८ हजारांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या अंदाजाला संस्थेने २० टक्के संभाव्यता दिली आहे. म्हणजेच सध्याच्या पातळीच्या तुलनेत निर्देशांकात १७ टक्क्यांची घसरण होऊ शकते.
कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे जाऊन अनेक महिने कायम राहणे, महागाई आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवावे लागणे आणि जागतिक आर्थिक विकासाचा वेग लक्षणीयरीत्या मंदावणे, ही या घसरणीमागील संभाव्य कारणे असतील. अशा परिस्थितीत कंपन्यांच्या नफ्यातील वाढीचा वेगही मंदावेल. आर्थिक वर्ष २०२६ ते २०२९ या काळात नफ्यात वार्षिक १५.८ टक्के चक्रवाढ वाढ अपेक्षित असली, तरी पुढील १२ महिन्यांत ही वाढ तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच आर्थिक परिस्थिती खालावल्याने शेअर बाजारातील मूल्यांकनही कमी होऊ शकते.
भारताच्या अर्थव्यवस्थेची लवचिकता महत्त्वाची
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ तुलनेने स्थिर आणि विविध क्षेत्रांमध्ये विभागलेली असल्याने जागतिक अनिश्चिततेचा परिणाम मर्यादित राहू शकतो, असे मॉर्गन स्टॅन्लेने नमूद केले आहे. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीचा वेग कमी झाल्यास किंवा भू-राजकीय तणाव निवळल्यास भारतीय शेअर बाजाराला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. भारतातील कंपन्यांच्या नफ्यातील वाढीचे चक्र आता वेग घेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. एकूणच, जागतिक बाजारातील घडामोडी, कच्च्या तेलाचे दर, भारत-अमेरिका व्यापार संबंध आणि देशांतर्गत आर्थिक धोरणे यावर भारतीय शेअर बाजाराची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२७ पर्यंत सेन्सेक्स ९५ हजार, तेजीच्या स्थितीत १ लाख ५ हजार, तर प्रतिकूल परिस्थितीत ६८ हजारांपर्यंत पोहोचण्याची तीन शक्यता मॉर्गन स्टॅन्लेने मांडल्या आहेत.
Read About : Gold and Silver Prices Crash – सोने-चांदीच्या दरात मोठी पडझड!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.