Ad Advertisement Ad Advertisement

Salman Khan Apologizes to Shraddha Kapoor 2026 – सलमान खानने श्रद्धा कपूरची मागितली जाहीर माफी

एकाच दिवशी दोन चित्रपटांची टक्कर, म्हणाला, ‘मला खरंच खूप वाईट वाटतंय’

मुंबई : Salman Khan Apologizes to Shraddha Kapoor – बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होणार म्हटले की कलाकारांमध्ये स्पर्धा, चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि निर्मात्यांमध्ये कमाईची धाकधूक सुरू होते. मात्र, याच बॉक्स ऑफिस क्लॅशच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याने चक्क अभिनेत्री श्रद्धा कपूरची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे, दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे समजल्यानंतर सलमानने स्वत: श्रद्धाला फोन करून दिलगिरी व्यक्त केली. ‘मला खरंच खूप, खूप वाईट वाटतंय’, अशा शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली.

एकाच दिवशी दोन चित्रपट, सलमानला नव्हती कल्पनाच

सलमान खानचा ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ आणि श्रद्धा कपूरची ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहेत. एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, आपल्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख निश्चित करताना श्रद्धाच्या चित्रपटाबाबत त्याला माहिती नव्हती.

तो म्हणाला, ”आम्ही ४ डिसेंबर ही तारीख जाहीर केली, तेव्हा श्रद्धाचाही चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे, हे मला माहीत नव्हते. मला खरंच खूप वाईट वाटतंय. हे आधी माहीत असते, तर मी तिच्या चित्रपटासोबत त्याच दिवशी आलो नसतो.”
श्रद्धाला केला फोन, उत्तर ऐकून सलमानही झाला खूश
श्रद्धा आणि तिच्या कुटुंबाशी आपले जुने संबंध असल्याचे सांगत सलमानने तिला स्वत: फोन केल्याचेही उघड केले. ”मी श्रद्धाला फोन केला आणि माफी मागितली. मी त्यांना लहानपणापासून मोठे होताना पाहिले आहे,” असे त्याने सांगितले.

मात्र, श्रद्धानेही अतिशय सकारात्मक उत्तर दिले. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्यासाठी पुरेशी संधी असल्याचे तिने सांगितले. यावर सलमानने आनंद व्यक्त करत प्रेक्षकांनी श्रद्धाचा चित्रपटही आवर्जून पाहावा, असे आवाहन केले.

‘मातृभूमी’ विरुद्ध ‘ईठा’, बॉक्स ऑफिसवर रंगणार मुकाबला

अपूर्व लखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’मध्ये सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह दिसणार आहे. देशभक्ती, भावना आणि ॲक्शनचा संगम असलेला हा चित्रपट आहे. तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’मध्ये श्रद्धा कपूर महाराष्ट्राच्या तमाशा आणि लावणी परंपरेतील दिग्गज कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची टक्कर होणार असली, तरी कलाकारांमधील नात्यात कटुता असण्याची गरज नाही, हे सलमानच्या कृतीतून दिसले आहे. आता ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या मनावर कोणता चित्रपट राज्य करणार आणि कमाईच्या शर्यतीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.