‘नैसर्गिक प्रसूतीला प्रोत्साहन, सुरक्षित मातृत्वाचा संदेश’ | १६० हून अधिक नर्सिंग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती संभाजीनगर: Natural Childbirth Awareness Rally – नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती करणे आणि नैसर्गिक प्रसूतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि.२२) एमआयटी नर्सिंग कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे विशेष जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ‘सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया’ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात १६० हून अधिक नर्सिंग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘नैसर्गिक प्रसूतीसाठी पदयात्रा’ या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक माता आणि बाळासाठी सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि संवेदनशील आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, हा होता. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल सदस्य अनुसया सावरगावे-भोसले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. विश्रांती गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. गर्भवती महिला, त्यांचे कुटुंबीय, आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचारी, परिचारिका, प्रसूती सेविका, विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांमध्ये नैसर्गिक प्रसूतीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
नैसर्गिक प्रसूती ही मातृत्वाच्या प्रवासातील एक महत्त्वाची प्रक्रिया असून, योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, नियमित तपासणी आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षित प्रसूती होणे आवश्यक आहे. प्रसूतीविषयी असलेले गैरसमज दूर करून महिलांना योग्य माहिती देणे, अनावश्यक भीती कमी करणे आणि नैसर्गिक प्रसूतीबाबत विश्वास निर्माण करणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सदस्या अनुसया सावरगावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मातृत्व आरोग्यसेवेत परिचारिका आणि प्रसूती सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, गर्भवती महिलांना योग्य समुपदेशन, मानसिक आधार आणि सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक सहकार्य देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एमआयटी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कोडीश्वर प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमातेसाठी नूतन काळे, रम्या स्टीफन, अक्षता बनसोडे, अंजली श्रीसुंदर, यश खरात, श्रद्धा चित्तेकर, प्रीती गायकवाड, मयुरी माधव, प्राप्ती गायकवाड आणि निरंजन राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
जनजागृतीवर उपक्रमांची आवश्यकता
नैसर्गिक प्रसूती ही अशी प्रसूती आहे जी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे, औषधांची किंवा शस्त्रक्रियेची गरज न पडता सामान्य मार्गाने होते. नैसर्गिक प्रसूती ही आईसाठी सुरक्षित व कमी धोका असतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी, संतुलित व पौष्टिक आहार, दररोज हलका व्यायाम करण्याचा सल्ला अनुसया सावरगावे यांनी दिला. नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व केवळ आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून सुरक्षित मातृत्व, संवेदनशील प्रसूतीसेवा आणि माता-बाल आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.