तुळजापूरकर यांचे मत ; पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती व्याख्यान उत्साहात
छत्रपती संभाजीनगर : Bank Privatization India बँकिंग व्यवस्था प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाच्या बचतीवर उभी असते आणि दुसरीकडे बुडीत कर्जे ही उद्योजकांचीच असतात. ते ‘राईट ऑफ’ करताना किंवा बुडीत बँकांचे पुनरुज्जीवन करताना सरकारकडून दिला जाणारा निधी हा सामान्यांचाच असतो. पण याची त्याला जाणीवही होत नाही. कारण दिला जाणारा पैसा हा थेट त्याच्या वरच्या खिशातून नाही तर मागील खिशातून असतो, अर्थसंकल्पातील म्हणजे शेवटी सामान्यांचाच पैसा असतो हे समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी केले.
‘बँकांचे खासगीकरण आणि जनतेच्या पैशांची सुरक्षा’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृती दिनी हे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. मनोरम शर्मा होत्या. सूत्रसंचालन सारंग टाकळकर यांनी केले तर डॉ. मोहन फुले यांनी आभार मानले.
तुळजापूरकर म्हणाले, बँकिंग क्षेत्रात येऊ घातलेली परकीय गुंतवणूक पुन्हा सामान्य ग्राहकाला जशी अडचणीत आणू शकते तशी ही देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाला धोकादायक ठरू शकते. दुचाकी घ्यायची असली तरी सामान्य माणसाचा सिबिल स्कोअर तपासला जातो , तर दुसरीकडे उद्योजकांना पाहिजे तेवढे कर्ज दिले जाते, जे कालांतराने बुडते आणि मग सगळी माफी देऊन अल्प वसुली दाखवून कर्जमुक्त दाखवले जाते. आजघडीला देशातील बँकिंग व्यवस्था ही सामान्य ग्राहकाला प्रवाहातून बेदखल करणारी असून माणसाने आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे.
सामान्यांच्या ठेवी धोक्यात
बँकांच्या खासगीकरणामुळे सामान्यांच्या ठेवी धोक्यात येण्याची शक्यता आहे. भांडवलावर विदेशी संस्थांचा ताबा आपल्या अर्थकारणालाही धक्का देणारा आहे. उद्योगांच्या बुडीत कर्जाचा बोजा हा कर दात्यावरच पडतो. शंभर रुपयातील ५५ रुपये मोठ्या उद्योगांना कर्ज रूपाने दिले जातात. त्यातील बहुतेक कर्ज पुढे थकतात. शेवटी त्यांना निर्लेखित केले जाते. ते करताना नाममात्र रक्कम उद्योगांकडून वळती होते. याचाच अर्थ तूट सामान्यांच्या करातून भरली जाते, पण याचा थेट फटका बसत नसल्याने सामान्य माणसाला यात काहीही वावगे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.