Ad Advertisement Ad Advertisement

Jayakwadi Bird Sanctuary Illegal Fishing – जायकवाडीतील डिझेल बोटींना वन्यजीव प्रशासनाचे अभय

पक्ष्यांचा अधिवास धोक्यात : अधिकारी सुस्त, कर्मचारी मस्त

छत्रपती संभाजीनगर Jayakwadi Bird Sanctuary Illegal Fishing : देशातील अतिमहत्वाचे पाणथळ क्षेत्र, रामसर आंतराष्ट्रीय दर्जासाठी प्रस्तावित आणि मराठवाड्यातील पक्ष्यांचे अधिवासस्थळ असलेल्या जायकवाडी पक्षी वन्यजीव अभयारण्यात (ता.पैठण) डिझेल बोटींचा वापर करून अनियंत्रित आणि व्यावसायिक मासेमारी जोरात सुरू आहे. वन्यजीव प्रशासनाच्या वरदहस्तामुळेच बोटचालकांचे फावत असून पक्षी अधिवासाच्या काही महत्वाच्या बेटांवरही मासेमारी करणाऱ्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे तो वन्यजीव विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवास आजरोजी संकटात सापडला आहे. येथील पक्षी जीवन डिझेल इंजिन वापरून मासेमारी करणाऱ्यांमुळे धोक्यात सापडेल आहे. एक ते तीन किमी लांब मत्सजाळे टाकून अनियंत्रित मासेमारी येथे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या बेटांवर पक्षी अंडी घालतात तिथेही या डिझेल बोटी चालवणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.

असे असता देखील जायकवाडी अभयारण्य प्रशासन आणि संभाजीनगर वन्यजीव विभाग मूग गिळून गप्प आहे. अभयारण्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि उपकरणांची सज्जता असतानाही नियमित गस्त बंद आहे. पक्ष्यांची समृद्धी अधिक वाढेल अशा ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे पक्षी अभ्यासकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अभयारण्यातील पक्ष्यांना कोणतीही हानी पोहोचू नये, त्यांचे अधिवास सुरक्षित राहावेत यासाठी बोटी नसलेले मत्स्य व्यावसायिक सकारात्मक असून डिझेल बोटींचा वापर करणाऱ्यांना त्यांनी विरोध दर्शविला आहे.

कारवाईचा दिखावा

अभयारण्याचा दर्जा आणि वन्यजीव सुरक्षा कायदा लागू असतानाही डिझेल बोटींवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हप्ते वसुली जोरात सुरू असून यामुळे सर्रास डिझेल बोटी अभयारण्य क्षेत्रात चालविल्या जात असल्याची चर्चा आहे.

Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.