रक्तदान शिबिरात ३२५ हून अधिक जणांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : 26/11 Martyrs Blood Donation Camp मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ रविवारी (दि.२२) येथे शासकीय रक्तपेढी घाटी रुग्णालय, सचिन अहिर युथ फाउंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वीरांच्या स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे,अशी अपेक्षा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही या शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांच्या उत्साह वाढविला.
मान्यवरांच्या हस्ते सन्मान
सचिन भाऊ अहिर यूथ फाउंडेशनच्या वतीने येथील सिडको परिसरात कालिका माता मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत ३२५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले. रक्तसंकलनासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सहायक आयकर आयुक्त मुकुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक शिनगारे, तळेकर, मुकुंद आघाव, अ.भा.यादव समाजाचे राष्ट्रीय सचिव बिशानकुमार यादव, नगरसेवक राज वानखेडे, किशोर नागरे, मुकेश जैन, राहुल सोनवणे, राहुल रोजतकर, ठाकरे सेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, जि.प.सदस्य निखिल चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
रक्तदात्याला फाउंडेशनच्या वतीने एक रोपटे भेट
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला फाउंडेशनच्या वतीने एक रोपटे भेट देण्यात आले. शासकीय व निमशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कोषागार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रेल्वे विभागाचे कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.