लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ ग्रामपंचायतीच्या कारवाईवर निर्णय
छत्रपती संभाजीनगर: High Court Stay on Encroachment Notices गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना बजावलेल्या नोटिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
लिंबाळा दाऊ ग्रामपंचायतीने १२ नोव्हेंबर रोजी काही ग्रामस्थांना नोटिसा बजावल्या होत्या. गट क्रमांक ३६ मधील गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वत:हून काढून घेऊन त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला कळवावे, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात येईल, असा इशारा नोटिसांमधून देण्यात आला होता.या नोटिसांना बापूराव भिकाजी जाधव व इतरांनी ॲड. राहुल चेबळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारी (ता.१९) न्या.संजय ए. देशमुख यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली.
यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. राहुल चेबळे यांनी ॲड. सुजीत मांडे यांच्यासह बाजू मांडली. याचिकाकर्त्यांनी संबंधित मालमत्ता खरेदीखतांद्वारे संपादित केली असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर फेरफार नोंदी करण्यात आल्या आहेत. सातबारा उताऱ्यावरही त्यांच्या नावांची नोंद आहे. काही याचिकाकर्ते या जागेवर आवश्यक कायदेशीर परवानग्या घेऊन व्यवसाय करीत असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत व प्रशासनाने संबंधित मालमत्ता गट क्रमांक ३६ मधील नसून सर्वे क्रमांक ५९-अ मधील असल्याची पडताळणी न करताच नोटिसा बजावल्याचा युक्तिवाद करण्यात आला. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲड. पी. एम. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.