‘बॉर्डरलँड्स’ माहितीपटाचे प्रदर्शन | अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘एआयएफएफ राउंड द इयर’ उपक्रमाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर: Borderlands Documentary Screened – भौगोलिक सीमांमुळे निर्माण होणारी विभागणी, त्यातून तुटणारी मानवी नाती आणि सीमावर्ती भागातील सामाजिक वास्तव यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘बॉर्डरलँड्स’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त माहितीपटाचे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले.
मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशनच्या वतीने आयोजित अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतर्गत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या ‘एआयएफएफ राउंड द इयर’ या उपक्रमाअंतर्गत दोन दिवसीय चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स येथील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात दिग्दर्शक समर्थ महाजन यांच्या ‘बॉर्डरलँड्स’ या माहितीपटाचे प्रदर्शन झाले.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुमारे ६७ मिनिटांच्या या माहितीपटातून भारतीय उपखंडातील भारत-पाकिस्तान, भारत-नेपाळ आणि भारत-म्यानमार सीमावर्ती भागांतील सहा व्यक्तींच्या जीवनकथा मांडण्यात आल्या आहेत. मानवी तस्करीतून बचावलेल्या महिला, तस्करीविरोधात काम करणारे कार्यकर्ते, सीमांमुळे विभक्त झालेली कुटुंबे आणि स्थलांतरित व्यक्तींच्या संघर्षमय अनुभवांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सीमा ही केवळ भौगोलिक किंवा राजकीय विभागणी नसून तिचा मानवी जीवन, नातेसंबंध, सामाजिक ओळख आणि परिस्थितीवर किती खोलवर परिणाम होतो, हे माहितीपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
लिंगभेद, सामाजिक स्तर आणि दिव्यांगत्वामुळे निर्माण होणाऱ्या अंतर्गत सामाजिक सीमांचाही संवेदनशीलपणे वेध घेण्यात आला आहे. बंगाली, हिंदी, नेपाळी, पंजाबी आणि मणिपुरी अशा विविध भाषांचा समावेश असलेल्या या माहितीपटाला उत्कृष्ट संकलनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाला माहितीपटाचे दिग्दर्शक समर्थ महाजन, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे विभागप्रमुख डॉ. शिव कदम, अमित पाटील, सुबोध जाधव, निखिल भालेराव, श्रीकांत येरूळे यांच्यासह मान्यवर, नागरिक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.