Ad Advertisement Ad Advertisement

Deforestation and Environmental Impact : विकास म्हणजे निसर्गाचा विनाश?

Deforestation and Environmental Impact : जंगल व वृक्षतोडीचा वातावरणावर होणारा परिणाम आपण सारेच पाहत आहोत. तापमान वाढतंय, पाऊस पुरेसा होत नाहीये. महाराष्ट्रात साध्या १६ टक्क्यांच्या आसपास असलेलं जंगल व वनसंपदा अशी संपत गेली की सर्वात रखरखीत राज्य म्हणून आपली नोंद होईल.

गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये येत होतो. समृद्धी महामार्गावरून खाली उतरून संभाजी नगरच्या रस्त्यावर शिरताच दोन्ही बाजूला निसर्गाचा केलेला विनाश दिसू लागला. असंख्य झाडं कापलेली होती. काही वृक्ष प्रचंड मोठे वा महाकाय होते. अनेक तर १०० वर्ष वा त्याहून अधिक जुने. वृक्षतोड सुरू होती शहराच्या विकासासाठी, ये-जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी, नागरी सुविधा देण्यासाठी. रस्ते रुंदीकरण म्हणजे विकास व नागरी सुविधा असं समजणाऱ्या सरकार व महापालिका यांनी म्हणे तिथं सुमारे ६५० झाडांची कत्तल केली आहे. झाडांची ही कत्तल पाहून संताप आला, वाईट वाटलं. खाली उतरून कत्तल झालेल्या झाडांची छायाचित्रं काढली. मुंबईकडे परत जाताना झाडांच्या तोडलेल्या फांद्या, बुंधे ट्रकमध्ये घालून नेणं सुरू होतं. मग कळलं की सोयगाव रेंज, कन्नड तालुक्यातील वडोद विठ्ठलाचं गावात याच पद्धतीने तब्बल तीन लाख झाडं तोडली जाणार असल्याचं ऐकिवात आहे. निसर्गाचा विनाश करून सुरू असलेल्या विकास कामांमुळे लोक चिडले आहेत. सिल्लोडमध्ये ५२ झाडं काही काळापूर्वी अवैधरित्या तोडण्यात आली.

त्याआधी चार दिवस नाशिकमध्ये असताना तिथंही कुंभमेळ्यासाठी १८०० झाडं तोडण्याचं ठरलं आहे, पण हरित लवादाने त्याला स्थगिती दिली आहे. जवळपास सर्व नाशिककर या प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात आहेत. नाशिकमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ३०० वृक्ष तोडण्यात आल्याचं तिथं समजलं. मुंबईहून नाशिक असो की संभाजीनगर असो, समृद्धी महामार्गच सर्वांना सोयीचा वाटतो. किती प्रशस्त आहे तो. पण, तो बांधताना डोंगर फोडले आणि किमान १ लाख ६५ हजार झाडं नष्ट करण्यात आली. हा आकडा राज्य रस्ते विकास मंडळाने दिलेला आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा अडीच ते तीन लाख आहे, असं पर्यावरणप्रेमी लोकांचं म्हणणं आहे. या महामार्गाने प्रवास वेगाने होतो, पण आसपास काही दिसत नाही. कुठं मध्ये थांबण्याची जागा नाही आणि सारं भकास दिसत राहतं. अशा रस्त्याने प्रवास करत असताना चालकाचा डोळा लागण्याची आणि अपघाताची शक्यता असते, त्यामुळे सतत एका व्यक्तीला चालकाच्या शेजारी बसून बोलत राहावं लागतं. ही जी झाडं तोडली, त्या बदल्यात त्याहून खूप अधिक झाडं लावली असं सांगितलं गेलं आहे, पण ती कुठं लावली ते दिसत नाही. लावली होती त्यातील किती जिवंत आहेत, त्यांची नियमित देखरेख केली जाते का ही माहिती कोणालाच नाही.

याआधी भीमाशंकर व कर्जत भागाच्या विकासासाठी म्हणजे तिथं येऊ घातलेल्या वीज प्रकल्पासाठी ३२ हजार ४५० झाडं तोडण्यात येणार असल्यानं त्या भागातील लोक संतापले आहेत. त्यांचा या बेभान वृक्षतोडीला विरोध आहे. हा प्रकल्प आणि वृक्षतोड यांमुळे संपूर्ण पट्टा रखरखीत होईल, तेथील हिरवळ व निसर्ग नष्ट होईल असा स्थानिक लोकांचा आक्षेप आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला तेथील लोकांचा विरोध आणि आक्षेप आहेच, पण त्यातील गंभीर बाब म्हणजे या प्रस्तावित बंदराला जोडणाऱ्या हरित महामार्गासाठी जवळपास ७३ हजार झाडांचा बळी घेतला जाणार आहे. महामार्गाचं नाव असेल ‘हरित’, पण त्यासाठी झाडं तोडून हरित पट्टा मात्र संपवला जाणार. हे सारं चौथ्या मुंबईच्या तयारसाठी सुरू आहे. ती वसवण्यासाठी असंख्य डोंगर व टेकड्या संपवून सपाटीकरण जोरात सुरू आहे. आधी मुंबई वाटेल तशी वाढली, ठाणे शहर व जिल्ह्यातही लोकांची खूप गर्दी झाली, नवी मुंबई कमी वाटू लागली म्हणून पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई होत आहे आणि नवी मुंबईच्या पलीकडे रायगडच्या पनवेलपासून पुढे तिसरी मुंबई येणार, ती उभी राहतानाही पहिला व सर्वात मोठा फटका बसेल तो तिथल्या निसर्गाला आणि वृक्षसंपदेला.

तिसऱ्या व चौथ्या मुंबईिवषयी बोलताना मुंबईत जी वृक्षतोड झाली आहे आणि सुरू आहे ते विसरून चालणार नाही. मुंबई वर्सोवा ते दहिसर उन्नत मार्गासाठी साध्या तिवरांची झाडं तोडणं जोरात सुरू आहे. अंधेरीच्या लोखंडवालाच्या मागील रस्त्याला लागून असलेल्या खाडीतील तिवरांचं जंगल संपवणं सुरूच झालं आहे. इतरही झाडं यापुढे तोडली जाणार आहेत. सुमारे एक हजार वृक्ष जमीनदोस्त केली जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात खनिज खाणी व अन्य प्रकल्पासाठी काही लाख झाडं तोडलं जाणार आहेत म्हणे. एकूणच विकास हवा असेल तर निसर्गाचा नाश होणारच, वृक्षतोड होईलच, अशी भावना लोकांमध्ये निर्माण करणं सुरू आहे.

शहराची वस्ती वाढते, वाहने, वाहतूक कोंडी वाढते, असलेले रस्ते लहान पडू लागतात, त्यामुळे रुंदीकरण गरजेचे असते. विविध उद्योग व प्रकल्प यावे लागतात, त्यांना मोठी जमीन लागते, मालवाहतूक सुलभ व्हावी यासाठी चांगले रस्ते लागतात; या सर्वांमध्ये पहिला बळी जातो झाडांचा. मराठवाडा हा आधीच रखरखाट असलेला आणि काही जिल्ह्यांत दोन-तीन टक्केच जंगल असलेला भाग अशा प्रकारांमुळे अधिक भकास होत जाईल. विदर्भातील काही जिल्ह्यात जंगल शिल्लक आहे, पण नवे प्रकल्प व योजनांसाठी तेही कमी होत आलं आहे. मुंबई, बीड, सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यांत जेमतेम एक टक्का जंगल उरलं आहे. जंगल व वृक्षतोडीचा वातावरणावर होणारा परिणाम आपण सारेच पाहत आहोत. तापमान वाढतंय, पाऊस पुरेसा होत नाहीये. महाराष्ट्रात साध्या १६ टक्क्यांच्या आसपास असलेलं जंगल व वनसंपदा अशी संपत गेली की सर्वात रखरखीत राज्य म्हणून आपली नोंद होईल. बाकी इथं सव्वा कोटी, तिथं सव्वा कोटी झाडं लावू या घोषणा प्रत्यक्षात आलेल्या दिसतच नाहीत.

संजीव साबडे
संपर्क : 88888 43371

Read About : Gravitational Waves : अंतराळाची अदृश्य कंपने: गुरुत्वाकर्षण तरंग
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.