Ad Advertisement Ad Advertisement

AI Retinal Scan Technology : डोळ्यांच्या रेटिनावरून हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारांचे निदान; नव्या एआय तंत्रज्ञानामुळे वेळेवर उपचार शक्य

ग्रामीण आरोग्य सेवांसाठीही तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार

बंगळुरू : AI Retinal Scan Technology केवळ डोळ्यांच्या नेत्रपटलाचे साधे छायाचित्र तपासून भविष्यात उद्भवणाऱ्या हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या गंभीर आजारांचा धोका वेळीच ओळखणारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. ऑक्युलोमिक्स या प्रगत वैद्यकीय शाखेवर आधारित रेमिडिओ कंपनीच्या या तंत्रज्ञानाचे सादरीकरण नुकतेच पार पडले असून देशातील काही भागांत याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

मानवी डोळ्याचा रेटिना हा शरीरातील असा एकमेव भाग आहे, जिथे सूक्ष्म रक्तवाहिन्या थेट आणि कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय स्पष्टपणे पाहता येतात. शरीरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांची सुरुवात होते, तेव्हा त्याचे पहिले सूक्ष्म परिणाम या रक्तवाहिन्यांवर दिसून येतात. हे नवीन एआय मॉडेल रेटिनाच्या छायाचित्रातील अत्यंत सूक्ष्म बदल, रक्तवाहिन्यांची रुंदी आणि रचनेतील बिघाड अवघ्या काही सेकंदांत अचूकपणे टिपते. वैद्यकीय परीक्षणानुसार, या तंत्रज्ञानाची संवेदनशीलता ९१ टक्के आणि अचूकता ८६ टक्क्यांहून अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे.

सर्वसाधारणपणे हृदय आणि किडनीचे आजार शेवटच्या टप्प्यात गेल्याशिवाय त्यांची लक्षणे लक्षात येत नाहीत. या आजारांच्या निदानासाठी महागड्या रक्त चाचण्या, ईसीजी किंवा स्कॅनिंग करावे लागते. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे नियमित डोळ्यांच्या तपासणीदरम्यानच रुग्णाला हृदय व किडनीच्या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना मिळू शकणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कमी खर्चात व जलद गतीने आजारांचे निदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Read About : Robotic Cardiac Surgery in India : रोबोटिक हृदयशस्त्रक्रियेत 2031 पर्यंत भारत अमेरिकेलाही पछाडणार?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.