दुर्मिळ आनुवंशिक आजारावरील ॲड्राबेटाडेक्स औषधाला अमेरिकेच्या FDA ची मंजुरी; मृत्यूचा धोका ५५ टक्क्यांनी कमी होण्याचा दावा
वॉशिंग्टन : Niemann-Pick Type C Disease लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या नीमन-पिक टाईप सी या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या आनुवंशिक मज्जासंस्थेच्या आजारावरील ॲड्राबेटाडेक्स ( ब्रँड नाव लेम्बाझ) या औषधाला अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करणारे आणि त्यांचे आयुर्मान वाढवणारे हे जगातील पहिलेच औषध ठरले आहे.
नीमन-पिक टाईप सी हा एक गंभीर चयापचय विकार आहे, जो साधारण दीड लाख लोकांमागे एका व्यक्तीला होतो. या आजारात पेशींमधील कोलेस्ट्रॉल आणि इतर स्निग्ध पदार्थांचे योग्य वहन होत नाही. परिणामी, हे घटक मेंदूमध्ये साचून राहतात आणि लहान वयातच रुग्णाची हालचाल, बोलणे, गिळणे आणि स्मरणशक्ती यावर गंभीर परिणाम होऊन मेंदूची कार्यक्षमता गतीने कमी होते. वयाच्या सहाव्या वर्षापूर्वी ज्या मुलांमध्ये या आजाराची मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे दिसू लागतात, त्यांच्यासाठी हा आजार अत्यंत प्राणघातक ठरतो.
बेरेन थेरप्युटिक्स आणि अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ हेल्थ यांच्या संयुक्त संशोधनातून हे औषध विकसित करण्यात आले आहे. किमान सात किलो वजन असलेल्या बालरुग्णांना आणि प्रौढांना दर दोन आठवड्यांनी पाठीच्या कण्यातून हे औषध दिले जाते. वैद्यकीय चाचण्यांनुसार, या औषधामुळे रुग्णांचा मृत्यूचा धोका ५५ टक्क्यांनी कमी झाल्याचे आणि त्यांचे सरासरी आयुर्मान लक्षणीयरीत्या वाढल्याचे सिद्ध झाले आहे. हे औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, उपचारादरम्यान नियमित श्रवण तपासणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
Read About : US Measles Outbreak : अमेरिकेत गोवरचा कहर, यंदा 5,838 रुग्ण; लसीकरणावर प्रश्नचिन्ह
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.