संशोधनातून १,७०० वर्षांपूर्वीच्या घुबडांच्या शिकारीचे पुरावे समोर
लंडन : Britain Frog Bones Mystery इंग्लंडमधील केंब्रिजशायर येथे एका रस्ता सुधारणा प्रकल्पाच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या तब्बल ८,००० बेडकांच्या हाडांचे गूढ अखेर दहा वर्षांनंतर उलगडले आहे. हे अवशेष मानवाने खाल्लेल्या बेडकांचे नसून, १,७०० वर्षांपूर्वीच्या रोमन ब्रिटन काळात घुबडांनी केलेल्या शिकारीचे असल्याचे ताज्या संशोधनातून समोर आले आहे.
बोर्नमाउथ युनिव्हर्सिटी आणि म्युझियम ऑफ लंडन आर्कियोलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. २०१६ ते २०१८ दरम्यान रस्ते कामाच्या वेळी पुरातत्वशास्त्राज्ञांना ४६ फूट लांबीच्या एका खड्ड्यात बेडकांची ही हजारो हाडे आढळली होती. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने हाडे कशी जमा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
संशोधकांनी या हाडांवरील खुणांचे सूक्ष्म निरीक्षण केले असता, त्यावर कापल्याचे किंवा भाजल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मात्र, पचनक्रियेमुळे होणारे परिणाम दिसून आले. यावरून शॉर्ट-इअर्ड आउल (घुबड) आणि हेन हॅरियर यांसारख्या शिकारी पक्ष्यांनी या बेडकांचा फडशा पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. रेडिओकार्बन डेटिंगनुसार ही हाडे १,७०० वर्षे जुनी असून, बहुतांश बेडूक एक वर्षापेक्षा कमी वयाचे होते.
त्या काळात पाण्याची पातळी कमी झाल्याने तयार झालेल्या तात्पुरत्या डबक्यांमध्ये बेडकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच, जंगलतोडीमुळे तयार झालेल्या मोकळ्या गवताळ प्रदेशामुळे घुबडांना राहण्यासाठी आणि शिकारीसाठी पोषक वातावरण मिळाले. विशेष म्हणजे, घुबड सहसा मानवी वस्तीजवळ वास्तव्य करत नाहीत; यावरून हिवाळ्यात रोमन काळातील लोक या भागापासून दूर राहत असावेत, असा महत्त्वाचा ऐतिहासिक अंदाजही संशोधकांनी व्यक्त केला आहे.
Read About : Nemesis Sun Twin Star Theory : डायनासोरच्या विनाशामागे सूर्याचा जुळा तारा? दर 2.6 कोटी वर्षांनी धूमकेतूंच्या वर्षावाचा सिद्धांत चर्चेत!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.